कोल्हापूरकरांचा नादच खुळा, रिक्षाचालकाला भररस्त्यात थुंकी पुसायला लावली

| Updated on: Sep 27, 2020 | 5:06 PM

माझं कोल्हापूर थुंकीमुक्त कोल्हापूर मोहिम आजपासून सुरु झाली. या विषयी जनजागृती सुरु असताना एक रिक्षाचालक रस्त्यात थुंकला. हा प्रकार लक्षात येताच चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्याला थुंकी स्वच्छ करायला लावली आणि त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. (Anti spit movement in Kolhapur)

कोल्हापूरकरांचा नादच खुळा, रिक्षाचालकाला भररस्त्यात थुंकी पुसायला लावली
Follow us on

कोल्हापूर : ‘माझं कोल्हापूर, थुंकी मुक्त कोल्हापूर’ या मोहिमेला आज पासून करवीर नगरीत सुरुवात झाली. या मोहिमेच्या सुरुवातीलाच कार्यकर्त्यांनी एका रिक्षाचालकाला कोल्हापूरी हिसका दाखवला. रस्त्यावर थुंकू नये याविषयी जागृती सुरू असतानाच भररस्त्यात पाण्याची पिचकारी मारणाऱ्या रिक्षाचालकाला चळवळीतील कार्यकर्त्यांनी थुंकी पुसायला भाग पाडलं. कोणतेही आढेवेढे न घेता रस्ता साफ करणाऱ्या या रिक्षाचालकाचे नंतर टाळ्या वाजवून त्यांनी कौतुकही केले. कोल्हापूरकर वेळ पडली तर कान उघडणी करतात त्याच वेळी ऐकणाऱ्याचं कौतुक देखील प्रेमाने करतात. हे आजच्या घटनेवरुन पुन्हा एकदा अधोरेखित झाले. (Anti spit movement in Kolhapur)

शहराची स्वच्छता आणि सौंदर्य उंचावण्यासाठी कोल्हापूरकरांनी आजपासून ‘माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर’ या मोहिमेला सुरवात केलीय. अँटी स्पिट चळवळी अंतर्गत आज ताराराणी चौकातून या मोहिमेला सुरुवात झाली. हातात फलक घेऊन कोल्हापूरकरांनी थुंकीमुक्त कोल्हापूर करण्याचा संदेश देत जनजागृती करण्यात आली.

एक दिल एक जान,देऊ स्वच्छतेकडे ध्यान, एक पिचकारी आयुष्याचा नाश करी, असे बॅनर- पोस्टर हातात घेत तरुणाईने ताराराणी चौका भोवती मानवी साखळी केलेली पाहायला मिळाली. करवीरनगरीत आज पासून सुरू होणारी ही चळवळ यापुढे शहराच्या सर्व भागात तसेच पूर्ण जिल्ह्यात राबवली जाईल, असे मोहिमेच्या प्रमुख दीपा शिपूरकर यांनी सांगितलेय.

दरम्यान, या मोहिमे अंतर्गत जनजागृती सुरू असतानाच चौकात सिग्नलला थांबलेल्या एका रिक्षाचालकाने रस्त्यावर तोंडातील पानाची पिचकारी मारली. चळवळीतील कार्यकर्ते आनंद आगळगावकर यांचे त्याकडे लक्ष जाताच त्यांनी रिक्षाचालकाला थांबवले. इतकंच नाही तर त्या रिक्षाचालकाला कोल्हापूरी भाषेत समजावून सांगत रस्ता स्वच्छ करण्याची विनंती केली. आपली चूक लक्षात येताच रिक्षाचालकाने त्याला प्रतिसाद दिला आणि रिक्षातील फडक्याने रस्ता स्वच्छ केला.

संबंधित बातम्या:

Sambhajiraje | संभाजीराजेंचे कोल्हापूर महापालिकेला पत्र, मोदींनी भेट नाकारल्याच्या उल्लेखाने नाराजी

LIVE: मराठा आरक्षणावर कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद

(Anti spit movement in Kolhapur)