कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा महापुराचं सावट, पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली

कोल्हापूर जिल्ह्यातील 102 बंधारे पाण्याखाली गेले असून 100 हून अधिक गावांचा अंशतः संपर्क तुटला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा महापुराचं सावट, पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली
| Updated on: Aug 06, 2020 | 9:00 AM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा महापुराचं सावट आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. पावसाचा जोर पाहता पंचगंगा यंदाही धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Kolhapur Panchganga River crosses warning level)

पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फुटांवर गेली आहे. इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फूट आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कायम असल्याने धाकधूक वाढली आहे.

पंचगंगा नदीकाठच्या गावांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 102 बंधारे पाण्याखाली गेले असून 100 हून अधिक गावांचा अंशतः संपर्क तुटला आहे. कोल्हापूर शहरातील सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या आजच जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

या पावसाने कोल्हापूरवासियांच्या मनात गेल्या वर्षीच्या पावसाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी महापुराने हाहा:कार माजवला होता. महापुरात अनेकांचे बळी गेले, तर हजारो घरं उद्ध्वस्त झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले.

पहा व्हिडिओ :

(Kolhapur Panchganga River crosses warning level)