दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देशात घातपाताचा मोठा कट? 46 रेल्वे स्थानके बॉम्बने उडवण्याची धमकी

| Updated on: Nov 01, 2021 | 2:45 PM

देशात कोरोना संकट कुठेतरी ओसरताना दिसतंय. पण हे संकट मावळत असताना देशावर आणखी दुसरं संकट आणण्याचा दावा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोय्यबाने केलं आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देशात घातपाताचा मोठा कट? 46 रेल्वे स्थानके बॉम्बने उडवण्याची धमकी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

लखनऊ : राज्यासह देशभरात आजपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत आहे. देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह आहे. अनेक नागरीक दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्ताने आपापल्या घरी, नातेवाईकांकडे जात आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारांमधील गर्दी वाढताना दिसत आहे. कोरोना संकट कुठेतरी ओसरताना दिसतंय. पण हे संकट मावळत असताना देशावर आणखी दुसरं संकट आणण्याचा दावा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोय्यबाने केलं आहे. या संघटनेने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र पाठवत देशातील 46 रेल्वे स्थानकं बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवली

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पत्र हे रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालं आहे. लष्कर-ए-तोय्यबाच्या एरिया कमांडरच्या नावाने हे पत्र आलं आहे. या पत्राची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या पत्रात उत्तर प्रदेशातील लखनऊ, अयोध्या, कानपूर, वाराणसीसह एकूण 46 रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस, श्वान पथक यांच्यासह गुप्तचर यंत्रणा कामाला लागली आहे.

रेल्वे स्थानकांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सगळ्याच गोष्टींची कसून झळती घेतली जात आहे. एखादी व्यक्ती संशयास्पद आढळल्यास तिला तातडीने ताब्यात घेऊन चौकशीचे अधिकार रेल्वे पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच 46 रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या आणि तिथून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये शोध मोहीम राबविली जात आहे.

याआधी देखील धमकीचं पत्र

दहशतवादी संघटनांनी धमकीचं पत्र पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2018 मध्ये देखील असंच एक पत्र समोर आलं होतं. पण या पत्रांकडे कानाडोळा करुन चालणार नाही. कारण काही वर्षांपूर्वी मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेमुळे मोठा हाहा:कार उडाला होता. त्यामध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. शेकडो नागरिक जखमी झाले होते. अनेक संसार उघड्यावर पडले होते. त्यामुळे या अशा धमकीच्या पत्राकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही. या गोष्टीचं गांभीर्य पोलिसांना देखील आहे. संबंधित धमकीच्या पत्राची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कामाला लागले आहेत. सर्च ऑपरेशन सुरुय. तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी देखील कोणतीही संशयास्पद वस्तू दिसली किंवा आढळल्यास त्याबाबत पोलिसांना कल्पना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

मुंबईत दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, तीन वर्षांच्या बालकासह पाच जण जखमी

मिस केरळ विजेत्या-उपविजेत्या सौंदर्यवतींचा भीषण कार अपघात, दोघींचा जागीच मृत्यू