आधी मुख्यमंत्री, आता नागपूरमध्ये जाऊन बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही तुकाराम मुंढेंच्या पाठीशी!

| Updated on: Aug 03, 2020 | 5:21 PM

"आम्ही सरकार म्हणून तुकाराम मुंढे आणि संपूर्ण प्रशासनाच्या बाजूने उभे आहोत", असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे (Minister Balasaheb Thorat on Tukaram Mundhe).

आधी मुख्यमंत्री, आता नागपूरमध्ये जाऊन बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही तुकाराम मुंढेंच्या पाठीशी!
Follow us on

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचं समर्थन केलं आहे (Minister Balasaheb Thorat on Tukaram Mundhe). “आम्ही सरकार म्हणून तुकाराम मुंढे आणि संपूर्ण प्रशासनाच्या पाठीशी उभे आहोत”, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे (Minister Balasaheb Thorat on Tukaram Mundhe).

कोरानाची परिस्थिती वाढत असताना काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यात प्रचंड संघर्ष बघायला मिळाला होता. संदीप जोशी यांनी मुंढेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या संघर्षाची राज्यभर चर्चा झाली. मात्र, या संघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांचं समर्थन केलं होतं. त्यापाठोपाठ आज बाळासाहेब थोरात यांनी तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

नागपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (3 ऑगस्ट) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “नागपूरच्या आजच्या बैठकीला सर्वांना बोलावलं होतं. नागपूरच्या स्थितीबाबत भविष्याचा विचार करुन नियोजन करत आहोत”, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं (Minister Balasaheb Thorat on Tukaram Mundhe).

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. त्याला थोरांनी उत्तर दिलं.

“मराठा आरक्षणाबाबत विनायक मेटे यांनी केलेले आरोप निराधार आहेत, मेटे सध्या विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत. मंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत अनेक बैठका घेतल्या. आम्ही दिल्लीतील मोठे वकील उभे केले. मराठा आरक्षण वैध ठरावं यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत”, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

तुकाराम मुंढेंबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

शिवसेना आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुकाराम मुंढे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये वाद सुरु आहेत. इतकेच काय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशीही त्यांनी पंगा घेतलाय. तुम्ही तुकाराम मुंढेंच्या मागे आहात की लोकनियुक्त महापालिकेच्या? असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना तुकाराम मुंढे शिस्तप्रिय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

“तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. त्यामुळे शिस्तीच्या मागे उभं राहणार”, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली (CM Uddhav Thackeray on Tukaram Mundhe).

“एखादा अधिकारी कठोर किंवा कडक असेल, पण त्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करुन घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणवले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्यापाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे”, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

“आततायीपणा कोणीच करु नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हीत जोपासलं जात असेल तर चांगलं आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असेल. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरुन चालणार नाही. म्हणून मी मागेसुद्धा म्हटले होते की, हा महाराष्ट्र आहे, त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

संबंधित बातमी :

तुकाराम मुंढेंच्या पाठीशी आहात का? मुख्यमंत्री म्हणतात…