शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पहिल्यांदाच अमोल कोल्हे आदित्य ठाकरेंची भेट

| Updated on: Nov 03, 2020 | 7:58 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज (मंगळवार) राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.

शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पहिल्यांदाच अमोल कोल्हे आदित्य ठाकरेंची भेट
Follow us on

मुंबई : पूर्वाश्रमीचे शिवसैनिक तथा सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज (मंगळवार) राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) यांची भेट घेतली. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर अमोल कोल्हेंनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईत ही भेट पार पडली. (MP Amol Kolhe meet minister Aditya Thackeray)

शिरुर लोकसभा मतदारसंघातील (Shirur loksabha Constituency) स्थानिक प्रश्नांवर अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. ‘भक्ती-शक्ती काॅरीडाॅर, ‘शिवसंस्कार सृष्टी’ आणि मतदारसंघातील पर्यटनाच्या संधी या विषयांवर आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. या भेटीचा तपशील अमोल कोल्हे यांनी सोशल मिडीयावरुन दिला आहे.

विविध योजना, मतदारसंघातले प्रश्न, पर्यटनाच्या संधी यांसह अनेक विषयांवर आदित्य ठाकरे-अमोल कोल्हे यांच्यामध्ये चर्चा झाली. ही चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचं अमोल कोल्हे म्हणाले. यावेळी अमोल कोल्हेंनी शिवगंध हे स्वत: लिहिलेलं पुस्तक आदित्य ठाकरे यांना भेट दिलं. भेटीनंतर औपचारिक फोटोसेशनही पार पडलं. फोटोत दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य होतं तसंच एवढ्या दिवसांनंतर झालेली भेट आणि सकारात्मक चर्चा चेहऱ्यावरील हास्य सांगून जात होतं.

लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर डॉ. कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमधील महत्त्वाचा नेताच पक्षातून बाहेर पडल्याने त्यावेळी शिवसेनेत खळबळ उडाली होती. त्यानंतरच्या काही दिवसांत राष्ट्रवादीने कोल्हेंनी शिरुर लोकसभेची उमेदवारी दिली. कोल्हेंनी देखील संधीचं सोनं करत मातब्बर शिवसेना नेते ज्यांनी सलग तीन वेळा शिरुर लोससभेचं प्रतिनिधित्व केलं होतं अशा आढळराव पाटलांना कोल्हेंनी आस्मान दाखवलं.

अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. कमी कालावधीत शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड झाली होती. शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून त्यांची गणना होऊ लागली होती. मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला अच्छे दिन दाखवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

संबंधित बातम्या

सेनेला ‘जय महाराष्ट्र’, डॉ. अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश