‘शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली तर ‘मातोश्री’वर दिवाळी साजरी होऊच देणार नाही’

| Updated on: Nov 03, 2020 | 3:39 PM

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 50 हजार रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जमा करावी.

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली तर मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊच देणार नाही
Follow us on

अमरावती: राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असेल तर ‘मातोश्री’वरही दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीचा फटका अमरावती जिल्ह्यालाही बसला होता. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. (MP Navneet Rana warns CM Uddhav Thackeray)

या पार्श्वभूमीवर मंगळवारी नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यंदा मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असणारे सोयाबीनचे पीक संपूर्ण हातातून गेले. यानंतर आता कपाशीवर मोठ्याप्रमाणात बोंड अळी व लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे आता कपाशीचे पीकसुद्धा वाया जात आहे. तेव्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 50 हजार रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जमा करावी. जेणेकरून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नाही. अन्यथा मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.

राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमवीर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या प्रमुख नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे केले होते. यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले होते. मध्ये रस्ते, पिकांचं झालेलं नुकसान, वीजेचे पडलेले खांब, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरं या सर्व बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. तर फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली होती.

संबंधित बातम्या: 

ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींंचं पॅकेज जाहीर, पण मदत नेमकी कशी मिळणार?

आमचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका, नवनीत राणा यांची लोकसभेत विनंती

पांढऱ्या सोन्याला लाल बोंड अळीचं ग्रहण, शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात

(MP Navneet Rana warns CM Uddhav Thackeray)