ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींंचं पॅकेज जाहीर, पण मदत नेमकी कशी मिळणार?

अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आज राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे. १० हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींंचं पॅकेज जाहीर, पण मदत नेमकी कशी मिळणार?

मुंबई: अतिवृष्टीमुळं राज्यभरातील शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये रस्ते, पिकांचं झालेलं नुकसान, वीजेचे पडलेले खांब, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरं या सर्व बाबींसाठी ही मदत असेल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (CM Uddhav thackeray announce help package for farmer)

शेतकऱ्यांना नेमकी कशी मदत मिळणार?

 • मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
 • ही मदत दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मिळणार आहे.
 • म्हणजे ५ एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना २० हजार रुपयांची मदत मिळेल.
 • अतिवृष्टीमुळं फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा
 • दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे.
 • मृत व्यक्तीच्या वारसांना, मयत पशुधनासाठी आणि घर पडझडीसाठीही भरीव मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

१० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचं विभागवार विभाजन

 • रस्ते आणि पूल – २ हजार ६३५ कोटी
 • नगरविकास – ३०० कोटी
 • महावितरण उर्जा – २३९ कोटी
 • जलसंपदा – १०२ कोटी
 • ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा – १ हजार कोटी
 • शेती आणि घरांसाठी – ५ हजार ५०० कोटी
 • एकूण – ९ हजार ७७६ कोटी रुपये

केंद्रानं राज्याचे एकूण ३८ हजार कोटी रुपये थकवले- ठाकरे

केंद्र सरकारकडे राज्याचे एकूण ३८ हजार कोटी रुपये येणं बाकी आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळाचे १ हजार ६५ कोटी, पूर्व विदर्भात आलेल्या पुरासंदर्भात ८०० कोटी आणि जीएसटी परताव्याचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. याबाबत केंद्राकडे सातत्यानं पाठपुरावा करुनही ही रक्कम अद्याप प्राप्त झाली नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर राज्यात ऑगस्टपासून अतिवृष्टी सुरु आहे, पण अजूनही पाहणीसाठी केंद्राचं पथक राज्यात आलं नसल्याचं ठाकरे म्हणाले.

दरम्यान आज पूर आणि अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते

संबंधित बातम्या: 

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

अतिवृष्टीग्रस्तांबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री आजच बैठक घेणार, अजितदादाही बैठकीला उपस्थित राहणार

CM Uddhav thackeray announce help package for farmer

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *