नाशिक कारागृहातील कैदीही ‘कोरोना’ लढ्यासाठी सरसावले, दोन लाख 77 हजारांची मदत

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी आपल्या निधीतून दोन लाख 76 हजार 957 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले आहेत. (Nashik Prisoners Financial Help for Corona)

नाशिक कारागृहातील कैदीही कोरोना लढ्यासाठी सरसावले, दोन लाख 77 हजारांची मदत
| Updated on: Mar 31, 2020 | 4:39 PM

नाशिक : कोरोना व्हायरस विरुद्ध सुरु असलेल्या महायुद्धात प्रत्येक जण मदतीसाठी पुढे येत आहे. बॉलिवूड कलाकारांपासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करत आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनीही कोरोनाविरुद्ध लढाईत आपले योगदान दिले आहे. कैद्यांनी जिल्हा प्रशासनाला दोन लाख 77 हजारांची मदत केली आहे. (Nashik Prisoners Financial Help for Corona)

नाशिकचे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. कैद्यांनी आपल्या निधीतून दोन लाख 76 हजार 957 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर कैद्यांनी त्यांच्या वेतनाची काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दान केली आहे. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या 1500 कैद्यांनी त्यांच्या पगारामधून 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत मदत केली आहे.

कैद्यांनी 2 लाख 76 हजार 957 रुपये जमा केले होते. त्यानंतर जेल प्रशासनाने ही रक्कम महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये धनादेशाच्या रुपात जमा केली. जेलर अशोक कारकर म्हणाले की, तुरुंगात मूर्ती बनवणे, लाकूड तोडणे, शेती, शिवणकाम इत्यादी काम केल्यानंतर मिळणाऱ्या पगारामधून कैद्यांनी ही रक्कम गोळा केली आहे.

नाशिकमधील कैद्यांनी यापूर्वीही सामाजिक भान दाखवत केरळ पूरग्रस्तांना दोन लाखांची मदत केली होती.