नाशिकचा कांदा बांगलादेशला, एक लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात

मागणी नसल्यामुळे उन्हाळा कांद्याला सरासरी 600 ते 700 रुपये इतका बाजार भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा तोट्यात विक्री करत होता

नाशिकचा कांदा बांगलादेशला, एक लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात
| Updated on: Jul 06, 2020 | 12:41 PM

लासलगाव : उन्हाळी कांद्याचे वाढलेले उत्पादन आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा कांद्याची मागणी घटली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तोट्यात विक्री करावी लागत असतानाच बांगलादेशला एक लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यात आल्याने नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Nashik Lasalgaon Onion exported to Bangladesh)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कांद्याची मागणी घटली, त्यात कांद्याचे उत्पादन वाढले. मागील हंगामात कांद्याला मातीमोल बाजार भाव मिळाला होता. मागणी नसल्यामुळे उन्हाळा कांद्याला सरासरी 600 ते 700 रुपये इतका बाजार भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा तोट्यात विक्री करत होता. हीच परीस्थिती राहिली असती तर कांद्याचे बाजार भाव 200 ते 300 रुपयांपर्यंत कोसळले असते आणि कांदा उत्पादकांना आपला कांदा मातीमोल भावात विक्री करावा लागला असता

ही परिस्थिती कांदा उत्पादकांवर पुन्हा येऊ नये, यासाठी दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनी वेळोवेळी केंद्र सरकारकडे पाठपुरवा केला. त्यामुळे वाणिज्य आणि ऑपरेटिंग विभागाने विशेष नियोजन करत बांगलादेशला कांदा पाठवण्यासाठी लोडर्ससोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठका घेतल्या.

बांगलादेशातील दरशना, बेनापोल आणि रोहनपूर स्थानकावर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लासलगाव, निफाड, खेरवाडी, नाशिक रोड, मनमाड येथील रेल्वे माल धक्क्यावरुन एक लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यात आला.

कांदा निर्यातीत गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वाढ झाली. सहा मे रोजी पहिली मालगाडी कांदा घेऊन लासलगाव स्थानकातून बांगलादेशला रवाना करण्यात आली. भुसावळ मंडळ विभागातील नाशिक जिल्हातून आतापर्यंत 41 मालगाडया बांगलादेशला पाठवण्यात आल्या.

हेही पहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

कांदा निर्यातीत मनमाडने आघाडी घेतली असून मनमाडहून अकरा मालगाडया, नाशिकरोड स्थानकातून सात, खेरवाडीहून आठ, निफाडहून दहा, लासलगावहून पाच मालगाडया आतापर्यंत रवाना करण्यात आल्याची माहिती दिंडोरी लोकसभा मतदारसंघ खासदार डॉ भारती पवार यांनी दिली.