राज्यातील जिम, रेस्टॉरंट सुरू करा; रोहित पवार यांची मागणी

| Updated on: Sep 22, 2020 | 11:22 AM

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून राज्यभरातील जिम, रेस्टॉरंट आणि क्लासेस सुरू करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील जिम, रेस्टॉरंट सुरू करा; रोहित पवार यांची मागणी
Follow us on

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरू करण्याची मागणी केली आहे. जिम, रेस्टॉरंट आणि क्लास चालक योग्य काळजी आणि दक्षता घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास काय हरकत आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. (rohit pawar Demand To Reopen Gyms)

रोहित पवार यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. ”कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात. पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जिम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही,असं माझं व्यक्तिगत मत आहे. याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा ही विनंती. सरकारकडून निर्णय घेतला जाईल असा विश्वास आहे,” असं पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रोहित पवार यांच्या आधी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी जिम आणि रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी केली होती. करोनाच्या काळात जिम बंद करण्यात आल्या आहेत. परंतू आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. राज्यातील जिम चालकांनी त्यात मोठी गुंतवणूक केली आहे, असं सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. जिम चालकांनीही सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. लॉकडाऊनमुळे जिम व्यवसाय डबघाईला आल्याचं त्यांनी सुळे यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी त्यांना जिम चालकांची व्यथा सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचं आश्वासन दिलं होतं.

त्यापूर्वी राज ठाकरे यांनीही राज्यातील जिम आणि व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी केली होती. जिम चालकांनी राज यांची भेट घेऊन लॉकडाऊनमुळे ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीची माहिती त्यांना दिली होती. आम्ही नियमांचं पालन करूनच जिम सुरू करण्यास तयार आहोत, असंही जिम चालकांनी राज यांना सांगितलं होतं. त्याशिवाय जिम चालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आता काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (rohit pawar Demand To Reopen Gyms)

 

दरम्यान, मिशन बिगीन अंतर्गत राज्यात अनेक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. राज्य सरकारने सर्व नियमांचं पालन करून उद्योगव्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच सरकारी आणि खासगी अस्थापनाही सुरू केल्या आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा दिली आहे. शिवाय हॉटेल्समधून पार्सल सर्व्हिस सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिम आणि रेस्टॉरंट चालकांनीही आपली मागणी पुढे रेटली असून त्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून पाठिंबा मिळत आहे.

संबंधित बातम्या:

व्यायाम करताना मास्कचे बंधन नाही, पण ‘हे’ महत्त्वाचे, जिम-योगा सेंटरसाठी केंद्राचे नियम

Unlock 3 Guidelines : देशभरात जिम पुन्हा सुरु होणार, अनलॉक 3 च्या गाईडलाईन्स जारी

Special Report | कुणाचं गणित कच्चं? LBT वरुन देवेंद्र फडणवीस, रोहित पवार यांच्यात जुंपली

(rohit pawar Demand To Reopen Gyms)