
विनय जगताप, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, भोर – पुणे | 3 मार्च 2024 : आपल्या आमदाराला सांभाळलं पाहिजे. त्यांना मावळे घालतात तसं चिलखत घालून पाठवलं पाहिजे. त्या विधानभवनामध्ये आजकाल काहीही होतंय. हे अबकी बार हे गोळीबार सरकार आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला. तुम्हाला चालेल का तुमचा आमदार तिकडं जाऊन डोकी फोडतोय.. हे विधानभवन आहे का ?, असा खडा सवालही त्यांनी विचारला. गेल्या आठवड्यात अधिवशेनादरम्यान विधिमंडळाच्या आवारात शिंदे गटाच्या दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात वाद आणि धक्काबुक्की झाली. हे प्रकरण चांगलंच गाजलं. याच मुद्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला निशाण्यावर धरलं.
शिंदे गटाच्या दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील धक्काबुक्कीवरून सुप्रिया सुळे यांनी चांगलाच निशाणा साधला. त्यांनी संजय राऊत यांच्या सोबत झालेलं कॉलवरच संभाषण सांगत मिश्किल टिपण्णीही केली. ‘ काल माझं संजय राऊतांशी बोलणं झालं. मी त्यांना गंमतीने म्हणाले विधानभवनमध्ये जाऊ नका, मग ते हसत म्हणाले का गं? मी त्यांना सांगितले हेल्मेट घालून जा.. आज काल मारामाऱ्या होत आहेत विधानभवनामध्ये..! ते म्हणाले ए, कुणाची हिम्मत नाही माझ्या अंगाला हात लावायची, मीच फोडीन त्यांच डोकं.. मग मी म्हणलं फोडू नका.. हे सगळं हसण्यावारी चालू होतं हा , नाहीतर त्याची ब्रेकिंग न्यूज कराल संजय राऊत डोकं फोडणार म्हणले म्हणून.. ‘ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी तो किस्सा सांगितला.
तुमचा खासदार पारदर्शक आयुष्य जगतो
तुमचा खासदार हा पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे हे 24 तास तुम्हाला माहिती असतं.. अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला टोला लगावला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांकडून सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी आणि सोशल मीडिया वापरावरून सातत्याने टीका होत असते. त्याच टीकेला अप्रत्यक्षपण उत्तर देतानाच सुप्रिया सुळे यांनी त्यांना टोला हाणला. बारामतीमध्ये त्या बोलत होत्या.
मी कुठे आहे हे 24 तास तुम्हाला माहीत असतं. माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई कुठंय ते.. सोशल मीडियावर दिसतंय आपली आई कुठल्या गावात भाषण करतीय ?.. कारण ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असं सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या. आपला कारभार पारदर्शक आहे, असे सांगतानाच अप्रत्यक्षरित्या त्यांनी विरोधकांना टोलाच लगावला. हमारी सबसे बडी ताकद, हमारी इमानदारी है. आमचे विरोधकही म्हणतात, की आमचे मनभेद नाहीत आमचे मतभेद आहेत.