YES बँकेवरील निर्बंधावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात…

| Updated on: Mar 06, 2020 | 3:59 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे खातेधारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे (Nirmala sitharaman on Yes Bank Crisis). दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी येस बँकेच्या खातेदारांना काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे.

YES बँकेवरील निर्बंधावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात...
Follow us on

नवी दिल्ली : “तुमचे पैसे कुठेही जाणार नसून ते सुरक्षित आहेत”, असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी येस बँकेच्या खातेधारांना दिलं आहे (Nirmala sitharaman on Yes Bank Crisis). भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे खातेधारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येस बँकेवरील निर्बंधाची माहिती समोर येताच खातेधारांची तुफान गर्दी बँक आणि एटीएमसमोर बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामण यांनी खातेदारांना संपूर्ण पैस परत मिळणार असल्याची ग्वाही दिली आहे (Nirmala sitharaman on Yes Bank Crisis).

“रिझर्व्ह बँकेचे अधिकारी या समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही गेल्या काही महिन्यांपासून याकडे लक्ष देत आहोत. यासाठी रिझर्व्ह बँकेने अनेक पाऊल उचलले आहेत”, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे ग्राहाकांना आपल्या खात्यातून फक्त 50 हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत. याबाबत निर्मला सीतारमण यांना प्रश्न विचारला असता, “आजरपण, लग्न समारंभ आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करुन बँकेवर निर्बंध असतानाही खातेधारांना 50 हजारांपर्यंत पैसे काढता यावे असा निर्णय घेण्यात आला”, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

SBI च्या माजी अधिकाऱ्यांकडे YES बँकेची सूत्र

बँकेची वाईट आर्थिक परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. तसेच, एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांना येस बँकेचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

या स्थगितीदरम्यान कुठल्याही खाते धारकाला त्याच्या कुठल्याही बचत, चालू किंवा इतर कुठल्याही खात्यातून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नाही. जरी या बँकेत एका खातेदारकाचे एकापेक्षा जास्त खाते असेल. तरी बँकेतून एकूण 50 हजाराची रक्कमच काढू शकतो, अशी माहिती आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.

SBI चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली. या भेटीत “काळजी करण्याची गरज नाही. आम्ही व्यवस्था बनवत आहोत. खातेधारांनी जमा केलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत”, असं त्यांनी सीतारमण यांना सांगितलं.

संबंधित बातमी : YES बँकेवर आरबीआयचे निर्बंध, ग्राहकांना 50 हजारच काढता येणार