नितेश राणेंना जामीन नाहीच, आणखी 5 रात्री पोलीस कोठडीतच!

| Updated on: Jul 05, 2019 | 8:58 PM

उपअभियंत्यावर चिखलफेक करणारे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची कोठडी 9 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. कणकवलीतील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला.

नितेश राणेंना जामीन नाहीच, आणखी 5 रात्री पोलीस कोठडीतच!
Follow us on

रत्नागिरी : उपअभियंत्यावर चिखलफेक करणारे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची कोठडी 9 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. कणकवलीतील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे नितेश राणे यांना आजच्यासह 5 रात्री पोलीस कोठडीतच काढाव्या लागणार आहेत. आमदार नितेश राणे यांच्यासह समर्थकाना पोलीसांनी काल संध्याकाळी अटक केली होती. मात्र छातीत दुखू लागल्याचं कारण देत नितेश राणे हे ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. आज  आमदार नितेश राणे यांच्यासह 18 समर्थकांना दुपारी कणकवली येथील दिवाणी न्यायालयात हजर केले.  कोर्टाने त्यांना 9 जुलैपर्यंत कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले.

वाचा : शरण आलेल्या आमदार नितेश राणे यांना अटक 

नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बुधवारी  उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की करुन, चिखलांच्या बादल्या अंगावर ओतल्या होत्या. याप्रकरणी  उपअभियंते प्रकाश शेडेकर यांनी नितेश राणे यांच्याविरोधात कुडाळ पोलिसात तक्रारी दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी नितेश राणेंच्या घराबाहेर फौजफाट्यासह हजेरी लावली. त्यावेळी दंगल नियंत्रणपथकही उपस्थित होतं. अखेर संध्याकाळी नितेश राणे स्वत:हून कणकवली पोलिसात हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

मी माफी मागतो : नारायण राणे

दरम्यान, भाजपचे सहयोगी खासदार आणि नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनी नितेश राणेंच्या कृत्याबद्दल स्वत: माफी मागितली आहे. “नितेशने आंदोलन केलं. मात्र चिखल फेकला म्हणून मी अधिकाऱ्याची माफी मागतो. शिवाय नितेशलाही माफी मागायला सांगेन”, असं नारायण राणे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे?

गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पावित्रा घेत उपअभियंत्याला धक्काबुक्की केली.  आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधण्याच्या प्रयत्न करुन, थेट हायवेवरील चिखलाने आंघोळ घातली.  नितेश राणेंनी शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहिली.

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, जागोजागी पसरलेले खडीचे साम्राज्य, तसेच सातत्याने अपघात होत असतात. त्यामुळे नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात जाऊन उप अभियंता प्रकाश शेडेकर यांची भेट घेतली. त्यानंतर आक्रमक झालेल्या राणेंनी शेडेकर यांना हाताला धरुन महामार्गाची जबरदस्तीने पाहणी करायला लावली. पाहणी झाल्यानंतर त्यांनी शेडेकर यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. एव्हढंच नव्हे तर त्यांना महामार्गाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

संबंधित बातम्या 

VIDEO : नितेश राणेंकडून उपअभियंत्याला पूलाला बांधून चिखलाची अंघोळ   

नितेश तू चुकलास, मी माफी मागतो : नारायण राणे    

शरण आलेल्या आमदार नितेश राणे यांना अटक