Rahat Indori | प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण

| Updated on: Aug 11, 2020 | 10:58 AM

राहत इंदौरी यांना इंदौरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Rahat Indori | प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण
Follow us on

भोपाळ : प्रख्यात गझलकार आणि कवी-गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात काल रात्री उशिरा त्यांना दाखल करण्यात आले. राहत इंदौरी यांचे पुत्र सतलज यांनी याबाबत माहिती दिली, नंतर स्वत: इंदौरी यांनीही याबद्दल ट्वीट केले. (Noted Urdu Poet Rahat Indori tested Corona Positive)

राहत इंदौरी यांना इंदौरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे कोव्हिड रुग्णालय आहे. राहत इंदौरी यांची प्रकृती स्थिर असून धोक्याच्या बाहेर आहे, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली. इंदौरी यांचे वय 70 वर्षे असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

“कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी कोरोना चाचणी करण्यात आली. तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मी अरविंदो हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, आपणास माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल.” असे ट्वीट त्यांनी केले आहे.


राहत इंदौरी हे प्रसिद्ध शायर तर आहेतच, याशिवाय त्यांनी बॉलिवूडसाठीही अनेक गाणी लिहिली आहेत. इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर अशा अनेक चित्रपटांची गाणी राहत इंदौरी यांनी लिहिली आहेत.

आज हमने दिल का हर किस्सा (सर), चोरी चोरी जब नजरे मिली (करीब), ये रिश्ता क्या कहलता है (मीनाक्षी), धुआ धुआ (मिशन काश्मीर), दिल को हजार बार (मर्डर) अशी अनेक अर्थपूर्ण गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. ऋत, मौजूद, नाराज अशा पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. (Noted Urdu Poet Rahat Indori tested Corona Positive)