तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज, 50 वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी

| Updated on: Jun 11, 2020 | 8:30 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखेर पुण्यातून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींच्या प्रस्थानास परवानगी मिळाली आहे (Palakhi Prasthan of Tukoba and Mauli).

तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज, 50 वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी
Follow us on

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखेर पुण्यातून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींच्या प्रस्थानास परवानगी मिळाली आहे (Palakhi Prasthan of Tukoba and Mauli). जिल्हा प्रशासनाने 50 वारकऱ्यांसह पालखी प्रस्थानास परवागनी दिली आहे. त्यामुळे दरवर्षी दिसणारा पालखी प्रस्थानाचा सोहळा यावेळी पुण्यात पाहायला मिळणार नाही. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ही माहिती दिली. तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा 12 जूनला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान 13 जूनला होणार आहे.

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत प्रशासनाने पालखी प्रस्थानावर काही निर्बंध घातले आहेत. यानुसार संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला केवळ 50 लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. मंदीर परिसरात निर्देशांचे पालन करुन ही परवानगी देण्यात आली आहे. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास देहूतून शुक्रवारी (12 जून) पालखी प्रस्थान होईल. तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीतून प्रस्थान करतील. मंदिराला प्रदक्षिणा घालून सायंकाळी पालखी इनामदार वाड्यात जाईल. या सोहळ्यासाठी उपस्थितांच्या संख्येवर 50 वारकऱ्यांची मर्यादा बंधनकारक आहे. दशमीला पुढील निर्णयानुसार पालखी पंढरपूरला प्रस्थान करेल.

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यास आळंदीतून शनिवारी (13 जून) पालखी प्रस्थान होईल. मंदिरातून पादुकांचं पालखीतून प्रस्थान होणार आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी माऊलींच्या आजोळ घरी जाईल. या सोहळ्यास मंदिर परिसरात केवळ 50 वारकऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असेल. यानंतर दशमीला पुढील निर्णयानुसार पालखी पंढरपूरला प्रस्थान करेल.

देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश नाही. या सोहळ्याला कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बंधनकारक आहेत. उपस्थित सर्व वारकऱ्यांना मास्क स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, शेकडो वर्षांच्या दिंडीची परंपरा यावर्षी कोरोना संसर्गाच्या सावटाखाली सुरु राहणार की खंड पडणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, राज्य सरकारच्यावतीने स्वतः अजित पवार यांनी प्रशासनासह वारकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि मार्ग काढला. यात संसर्गाचा धोका लक्षात घेऊन सर्व ती खबरदारी घेण्याचं आश्वासन मिळाल्यावर प्रशासनाने वारकऱ्यांना काही अटी आणि शर्तींसह परवानगी दिली आहे.

संबंधित बातम्या : 

दिवेघाटात वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला, संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू

मराठी भाषा दिन 2020: विधानभवनात ग्रंथदिंडीचं आयोजन

Palakhi Prasthan of Tukoba and Mauli