हुश्श! पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही ‘कोरोना’मुक्त

| Updated on: Mar 26, 2020 | 9:57 AM

पिंपरी चिंचवडमधील तिघांची पुन्हा एकदा 'कोरोना' चाचणी होईल. त्याच्या अहवालानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल (Pimpari Chinchwad Corona Patients to get Discharge)

हुश्श! पुण्याच्या दाम्पत्यासोबत दुबईला गेलेले पिंपरी-चिंचवडचे तिघेही कोरोनामुक्त
Follow us on

पिंपरी चिंचवड : पुण्याच्या ‘कोरोनाग्रस्त’ दाम्पत्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधल्या पहिल्या तीन ‘कोरोना’ग्रस्तांनाही घरी सोडण्यात येणार आहे. पुण्याच्या दाम्पत्यासोबतच दुबईचा प्रवास करुन आलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तिघा ‘कोरोना पॉझिटिव्ह’ रुग्णांचा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. दुसऱ्या चाचणीच्या अहवालानंतर तिघांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. (Pimpari Chinchwad Corona Patients to get Discharge)

पिंपरी-चिंचवडमधल्या या तीन रुग्णांना ‘कोरोना’ विषाणूंची लागण झाल्याचं 11 मार्चला समजलं होतं. त्यानंतर तिघांवर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरु होते. हे तिन्ही रुग्ण पुण्याच्या रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालेल्या दाम्पत्यासोबत दुबईला गेले होते. पुण्यातील दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील या रुग्णांची तपासणी करण्यात आली होती, तेव्हा या तिघांनाही ‘कोरोना’चे निदान झाले होते.

तिघा जणांचा निगेटिव्ह अहवाल काल (बुधवारी) रात्री उशिरा आरोग्य विभागाच्या हाती लागला. त्यानुसार आज त्यांची पुन्हा एकदा चाचणी होईल. त्यांच्या घशातील द्रव नमुने तपासणीसाठी पाठवले जातील. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र पुढील 14 दिवस त्यांनाही घरातच विलग राहावे लागेल.

पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये उपचारांनंतर चांगली सुधारणा दिसून येत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांत पिंपरी-चिंचवडमध्ये एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे एकूण 12 रुग्ण आढळले

पुण्याच्या  नायडू रुग्णालयातून काल (बुधवार 25 मार्च) पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त ठरलेल्या पुण्याच्या दाम्पत्याला सकाळी डिस्चार्ज मिळाला होता. तर रात्री या दाम्पत्याची मुलगी, कुटुंबाला मुंबईहून पुण्याला नेणारा टॅक्सीचा चालक आणि त्यांचा आणखी एक सहप्रवासी यांना घरी पाठवण्यात आले. घरी सोडल्यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे.

नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत असताना पहिल्या कोरोनामुक्त दाम्पत्याने रुग्णालयाचे सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांचे पत्रामार्फत आभार मानले होते.

Pimpari Chinchwad Corona Patients to get Discharge