आता तुमची जमीन कोणीही परस्पर हडपू शकणार नाही; पीएम मोदींकडून SVAMITVA योजना लाँच

| Updated on: Oct 11, 2020 | 4:00 PM

लोकनायक जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1.32 लाख लोकांच्या घरांचं स्वामित्व पत्र त्यांना सोपवलं.

आता तुमची जमीन कोणीही परस्पर हडपू शकणार नाही; पीएम मोदींकडून SVAMITVA योजना लाँच
Follow us on

नवी दिल्ली : लोकनायक जयप्रकाश नारायण (Jayaprakash Narayan) आणि नानाजी देशमुख (Nanaji Deshmukh) यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1.32 लाख लोकांच्या घरांचं स्वामित्व पत्र (प्रॉपर्टी कार्ड – SVAMITVA Scheme) सोपवलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता लोकांकडे एक कायदेशीर कागदपत्र आहे, ज्याद्वारे त्यांचं घर आता त्यांचंच राहणार आहे. कोणीही त्यांच्या जमिनीकडे वाईट नजरेने पाहू शकणार नाही. कोणही त्यांची जमीन त्यांच्या परस्पर हडपू शकणार नाही. (PM Narendra Modi distributes property cards under SVAMITVA scheme)

पंतप्रधान मोदींनी यावेळी कृषी कायद्यांना होत असलेल्या विरोधाबाबत भाष्य केले. मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांना या कायद्यामुळे अनेक सुविधा मिळत आहेत. ही गोष्ट काही लोकांना खुपत असल्यामुळे ते लोक या कायद्याला विरोध करत आहेत. कृषी कायद्यामुळे त्या नेत्यांची काळी कमाई बंद झाली आहे.

या योजनेतंर्गत देशातील सहा राज्यांमधील 763 गावातील नागरिकांना फायदा होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील 346, हरियाणातील 221, महाराष्ट्रातील 100, उत्तराखंडमधील 55, मध्य प्रदेशातील 44 आणि कर्नाटकातील दोन गावांचा समावेश आहे.

यावेळी मोदी म्हणाले की, आज लोकनायक जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांची जयंती आहे. आजच्या दिवशी हे विराट काम आपण करतोय, याचा मला खूप आनंद होत आहे. आजपासून तुमच्याकडे एक अधिकार आहे, एक कायदेशीर कागदपत्र आहे, ज्यानुसार तुमचं घर केवळ तुमचंच आहे आणि तुमचंच राहील. या योजनेमुळे आपल्या देशातील गावांमध्ये ऐतिहासिक परिवर्तन घडेल. आज ज्या लोकांना त्यांच्या घराचे स्वामित्व पत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड मिळालं आहे, ज्यांनी ते डाऊनलोड केलं आहे, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो.

 

काय आहे ही योजना?

स्वामित्व योजनेद्वारे भूधारक त्यांची संपत्ती आर्थिक संपत्तीप्रमाणे वापरू शकणार आहेत. या संपत्तीचा उपयोग कर्ज घेणे किंवा अन्य आर्थिक लाभ घेण्यासाठी केला जाऊ शकतो. पंचायत राज मंत्रालयाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. 24 एप्रिल रोजी पीएम मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. ग्रामीण भागातील लोकांना ‘रेकॉर्ड ऑफ राइट्स’ देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.

संबंधित बातम्या

ना शिवसेना, ना अकाली, पासवानांच्या निधनानंतर NDA जवळपास रिकामी, एकट्या आठवलेंवर भाजपची भिस्त

ही गोष्ट खूपच धोकादायक; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ व्हिडीओवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

नितीश कुमारांच्या डोकेदुखीत वाढ; तिकीट कापलेले भाजप नेते पासवानांच्या पक्षात

(PM Narendra Modi distributes property cards under SVAMITVA scheme)