SWAMITVA Yojana | प्रत्येक गावात ड्रोनद्वारे मालमत्तेचं मॅपिंग, पंतप्रधान मोदींकडून स्वामित्व योजनेचा प्रारंभ

| Updated on: Apr 24, 2020 | 12:08 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिनानिमित्त देशातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (PM Modi Launches SWAMITVA yojana)  संवाद साधला.

SWAMITVA Yojana | प्रत्येक गावात ड्रोनद्वारे मालमत्तेचं मॅपिंग, पंतप्रधान मोदींकडून स्वामित्व योजनेचा प्रारंभ
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिनानिमित्त देशातील सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (PM Modi Launches SWAMITVA yojana)  संवाद साधला. यावेळी मोदींनी ई ग्राम स्वराज्य मोबाईल अॅप आणि स्वामित्व योजनेचा शुभारंभ केला. (PM Modi Launches SWAMITVA yojana) 

स्वामित्व योजनेनुसार सर्व गावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून संपत्तीचा लेखाजोखा घेतला जाईल, त्यानुसार मालमत्तेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले जाईल, त्यामुळे वाद मिटतील आणि कर्ज घेणे सुलभ होईल, असं मोदी म्हणाले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यात प्रायोगित तत्वावर ही योजना सुरु होईल. त्यानंतर त्यातील त्रुटी दूर करुन देशभर लागू करण्यात येईल.

वेगवेगळ्या अॅपमध्ये काम करण्याची गरज नाही, एकाच ठिकाणी सर्व पंचायतींची माहिती उपलब्ध असेल, गावातील कोणताही नागरिक आपल्या ग्रामपंचायतीची माहिती मोबाईलवर पाहू शकेल, यातून पारदर्शकता वाढेल आणि कामाला गती येईल, असं मोदींनी सांगितलं.

एके काळी शंभर पंचायातींमध्येही broadband नव्हता,आता सव्वा लाख पेक्षा अधिक पंचायातींपर्यंत broadband सुविधा पोहोचली, शहर-गावातील अंतर मिटवण्यासाठी आज दोन नव्या योजना ई ग्राम स्वराज आणि स्वामित्व योजना सुरु केल्या आहेत.

पंचायत व्यवस्था जितकी मजबूत, तितकी लोकशाही बळकट आणि विकासाचा लाभ अखेरच्या घटकापर्यंत पोहचण्यास मदत होईल. प्रत्येक गावांनी स्वावलंबी होणं गरजेचं, त्यामुळे कोरोनासारख्या काळात दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही, पंचायत राज जितकं मजबूत असेल, तितकी लोकशाही मजबूत होईल आणि शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

गावापर्यंत सुराज्य पोहोचवण्याच्या संकल्पाचे फलित म्हणजे पंचायत राज. कोरोना’च्या अनुभवाने सर्वात मोठा धडा शिकवला, तो रस्ता म्हणजे आपल्याला स्वावलंबी व्हावं लागेल, त्याशिवाय अशी संकटं झेलता येणार नाहीत, असं मोदी म्हणाले.

कोरोनामुळे आपल्याला व्हिडओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधावा लागत आहे, देशभरातील सरपंच यामध्ये सहभागी आहेत, सर्वांचं स्वागत, चांगल्या कामासाठी पंचायतींना पुरस्कार, गावापर्यंत सुराज्य पोहोचवण्यासाठी पंचायत महत्त्वाची, असं मोदींनी नमूद केलं.

ई-ग्राम स्वराज अ‍ॅप (e-GramSwaraj portal) :

  • ई-ग्राम स्वराज अ‍ॅपच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा निधी, त्यातील कामकाजाची संपूर्ण माहिती मिळेल.
  • गावातील कोणताही नागरिक आपल्या ग्रामपंचायतीची माहिती मोबाईलवर पाहू शकेल.
  • या माध्यमातून पारदर्शकताही येईल आणि प्रकल्पांच्या कामांनाही गती दिली जाईल.

स्वामित्व योजना (What is SWAMITVA yojana) :

  • स्वामित्व योजनेतून ग्रामस्थांना बरेच फायदे मिळतील. यामुळे मालमत्तेवरुन होणारा गोंधळ आणि भांडणे संपतील.
  • सर्व गावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून मॅपिंग केले जाईल.
  • प्रत्येकाला मालमत्तेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र दिले जाईल.
  • यामुळे खेड्यातील विकास योजनांच्या नियोजनास मदत होईल. याद्वारे आपण शहरांप्रमाणे खेड्यांमध्येही बँकांकडून कर्ज घेण्यास सक्षम असाल.