कोरोनाविरुद्धची लढाई प्रदीर्घ, पंतप्रधान मोदींचे स्पष्ट संकेत, जनतेने दाखवलेल्या गांभीर्य-एकजूटीचंही कौतुक

| Updated on: Apr 06, 2020 | 2:31 PM

ही लढाई दीर्घकाळ चालेल, पण आपल्याला थांबायचं नाही, थकायचं नाही, विजयी व्हायचं आहे, असं सांगत मोदींनी मनोबल वाढवलं. (PM Narendra Modi on Corona on BJP Foundation Day)

कोरोनाविरुद्धची लढाई प्रदीर्घ, पंतप्रधान मोदींचे स्पष्ट संकेत, जनतेने दाखवलेल्या गांभीर्य-एकजूटीचंही कौतुक
Follow us on

नवी दिल्ली : कोरोनाचा धोका भारताने वेळीच ओळखला. ‘कोरोना’विरोधात देशातील लढाई वेगवान आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचं कौतुक करण्यात येत असून प्रमुख राष्ट्रांच्या देशांनीही पाठ थोपटली आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याचा सार मांडला. ही लढाई दीर्घकालीन असेल असे सूतोवाचही त्यांनी केले. (PM Narendra Modi on Corona on BJP Foundation Day)

इतक्या विशाल देशात लोक अशा प्रकारच्या शिस्त आणि सेवा भावनेचे पालन करतील याची कुणाला कल्पनाही नव्हती. एक दिवसाचा जनता कर्फ्यू किंवा दीर्घकालीन लॉकडाऊन, 130 कोटी जनतेने दाखवलेले गांभीर्य, एकजूट प्रशंसनीय आहे, असं मोदी म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या 40 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला.

काल रात्री गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी, साक्षर-निरक्षर अशा 130 कोटी जनतेने एकजूट दाखवली, आपण एकटे नसल्याची सामूहिक भावना दिवे लावताना दिसली. कोरोनाविरुद्ध लढण्याचा आपला संकल्प दृढ केला, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

ही लढाई दीर्घकाळ चालेल, पण आपल्याला थांबायचं नाही, थकायचं नाही, विजयी व्हायचं आहे. आज देशाचे लक्ष्य एक आहे, ध्येय एक आहे आणि संकल्प एक आहे – कोरोना साथीच्या विरुद्ध लढ्यात विजय, असं मोदींनी स्पष्ट केलं.

नरेंद्र मोदींकडून भाजप कार्यकर्त्यांसाठी पंच-आग्रह धरण्यात आले आहेत.

-गरिबांना रेशनसाठी अविरत सेवा अभियान

-तुमच्याशिवाय पाच जणांना मास्क वितरीत करा

-डॉक्टर-नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, बॅंक-टपाल कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी अशा पाच वर्गाला धन्यवाद पत्र बूथनुसार गोळा करा

-आरोग्य सेतू या app विषयी माहिती द्या आणि किमान 40 जणांना ते डाऊनलोड करण्याचा आग्रह धरा

– पंतप्रधान-केअर फंडला योगदान द्या आणि इतर 40 जणांना प्रेरित करा (PM Narendra Modi on Corona on BJP Foundation Day)

कोणाच्याही मदतीला जाताना चेहऱ्यावर मास्क लावा, डॉक्टरांसाठी आवश्यक मास्क गरजेचे नाहीत, सध्या कपड्या-टॉवेलपासून मास्क बनवा, असं नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितलं.

हेही वाचा : जी खबरदारी महाराष्ट्राने घेतली, ती दिल्ली सरकारने का घेतली नाही? तब्लिगीवरुन पवारांचा सवाल

आज संपूर्ण जगासाठी एकच मंत्र आहे- सामाजिक अंतर आणि शिस्त पूर्णपणे पाळली पाहिजे. मला आशा आहे की प्रत्येक भाजपा कार्यकर्ता, स्वतःचे रक्षण करताना आपल्या कुटुंबाचेही संरक्षण करेल आणि देशाचे संरक्षण करेल. या तत्त्वाचे आपण पालन केले पाहिजे, असं मोदींनी सांगितलं.