‘महापुरात आम्हाला वाचवलं, महामारीत तुम्हाला वाचवू’, महापुरात बुडालेल्या चिखलीकरांची सरकारला मदत

| Updated on: Apr 15, 2020 | 7:34 PM

चिखलीकरांकडून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी गावातून मोठी रक्कम उभी केली जात आहे (Village of Kolhapur to donate CM relief fund amid Corona).

महापुरात आम्हाला वाचवलं, महामारीत तुम्हाला वाचवू, महापुरात बुडालेल्या चिखलीकरांची सरकारला मदत
Follow us on

कोल्हापूर : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका बसला. त्यावेळी यात प्रभावित झालेल्या करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावाला राज्यभरातून मदत मिळाली. आता याच मदतीतून उतराई होण्याचा प्रयत्न चिखलीकरांना सुरु केला आहे. चिखलीकरांकडून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी गावातून मोठी रक्कम उभी केली जात आहे (Village of Kolhapur to donate CM relief fund amid Corona). त्याला लहानग्यांपासून सामान्य कामगारांपर्यंत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. लवकरच किमान 5 लाखांचा निधी जमवण्याचा चिखली ग्रामस्थांचा मानस आहे.

8 महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराने अनेक गावांना मोठं नुकसान झालं. या महापुराचा सर्वाधिक फटका करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या गावाला बसला. महापूरात चिखली गाव तर 10 दिवस पूर्ण पाण्याखाली होतं. अनेकांची घरं पडली, जनावर वाहून गेली. या महापुरानं आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या प्रयाग चिखली गावाला अक्षरशः हादरवून सोडलं. पुराच्या काळात आणि पूर ओसरल्यानंतर राज्य सरकारबरोबरच अनेक संस्था संघटनांनी प्रयाग चिखली गावाला पुन्हा उभं राहण्यासाठी मदतीचा हात दिला. आर्थिक मदतीसोबतच जीवनावश्यक वस्तू देऊन चिखलीकरांना मदतीचा हात दिला.

संकटाच्या काळात झालेल्या मदतीतून उतराई होण्याचा प्रयत्न आता चिखलीकरांनी देखील सुरु केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मदत म्हणून गावातून प्रत्येकजण यथाशक्ती पैसे जमा करत आहे. लवकरच ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे. या मोहिमेत लहान मूलंही मागे नाहीत. आराध्या चौगुले या चिमुरडीने आपल्या वाढदिवसासाठी साठवलेले पैसे यासाठी दिलेत.

गावातील तरुणांनी एकत्र येत सुरु केलेल्या मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. अवघ्या काही दिवसात 2 लाखांपर्यंतची मदत जमा झाली आहे. गावाच्या वतीने किमान 5 लाखांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा ग्रामस्थांचा मानस असून त्यासाठी प्रयत्न सुरु आहे. संकट तर सर्वांनाच येतात. या काळात मदतीसाठी समोर आलेल्यांची जाण राखणं महत्वाचं असतं. म्हणूनच आपल्या संकटकाळात सोबत राहिलेल्या सरकारच्याही पाठीशी या कोरोनाच्या संकटकाळात उभं राहण्याचा चिखलीकरांचा निर्णय कौतुकास्पद आहे.

Village of Kolhapur to donate CM relief fund amid Corona