होळीला अॅडमिट, गुढीपाडव्याला डिस्चार्ज, पुण्यातील दाम्पत्याची ‘कोरोना’वर मात

| Updated on: Mar 25, 2020 | 9:04 AM

होळीच्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला या दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे (Pune Corona Patient Couple is Disease Free)

होळीला अॅडमिट, गुढीपाडव्याला डिस्चार्ज, पुण्यातील दाम्पत्याची कोरोनावर मात
Follow us on

पुणे : कोरोनाची लागण झालेले राज्यातील पहिले दाम्पत्य कोरोनामुक्त झाले आहे. पुण्याचे रहिवासी असलेल्या संबंधित दाम्पत्याची दुसऱ्यांदा चाचणी झाली असता, त्याचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. या रुग्णांना आज सकाळी डिस्चार्ज दिला जाणार आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानावे लागेल. (Pune Corona Patient Couple is Disease Free)

मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी हॉस्पिटलमधून घरी जायला मिळणार, याचा आनंद हे दाम्पत्य व्यक्त करत आहे. त्याचबरोबर सर्वांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी ‘टीव्ही9’ च्या माध्यमातून जनतेला केलं.

होळीच्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला या दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुबईला जाऊन आलेल्या या दाम्पत्यातील पत्नीला आधी कोरोनाचे निदान झाले, त्याच दिवशी पतीचाही अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

पती-पत्नीचा 14 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर परवा या रुग्णांचे एनआयव्ही अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यानंतर काल दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या रुग्णांना सकाळी घरी पाठवले जाईल. मात्र पुढील 14 दिवस त्यांना घरीच राहण्याची सक्ती असेल.

रिपोर्ट दोन वेळा निगेटीव्ह आल्यावर डिस्चार्ज देण्याच्या सूचना आहेत. परंतु त्यानंतरही रुग्णांना खबरदारी म्हणून दोन आठवडे घरीच विलगीकरणात राहावे लागते. (Pune Corona Patient Couple is Disease Free)

त्यांच्या मुलीचे रिपोर्ट संध्याकाळी येणार असून तिचे अहवालही निगेटिव्ह येण्याची आशा आहे. त्यानंतर तिलाही घरी सोडण्यात येईल.

पुण्यात ‘कोरोना’च्या समूह संसर्गाचा धोका वाढला, परदेशी न जाताच महिलेला लागण, चार नातेवाईकही बाधित

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतर चौघांनाही लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे. डिस्चार्ज मिळालेल्या आठही रुग्णांना पुढचे 14 होम क्लारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळताना दिसत आहे. (Pune Corona Patient Couple is Disease Free)