फुकट्या प्रवाशांचा ताप! रेल्वेने दहा महिन्यात ‘इस्रायलच्या लोकसंख्येइतके’ प्रवासी पकडले

| Updated on: Aug 27, 2019 | 8:09 AM

भारतीय रेल्वेमधील विनातिकीट प्रवाशांकडून दंडाच्या स्वरुपात वसूल करण्यात आलेली रक्कम गेल्या तीन वर्षांत 30 टक्क्यांनी वाढल्याचं माहितीच्या अधिकारा अंतर्गत समोर आलं आहे

फुकट्या प्रवाशांचा ताप! रेल्वेने दहा महिन्यात इस्रायलच्या लोकसंख्येइतके प्रवासी पकडले
Follow us on

नवी दिल्ली : रेल्वे असो वा बस, तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देशात कमी नाही. मात्र ही संख्या किती मोठी असेल, यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल. गेल्या दहा महिन्यात तब्बल 89 लाख विनातिकीट रेल्वे प्रवासी पकडण्यात आले आहेत. ही प्रवासी संख्या इस्रायल देशाच्या लोकसंख्येइतकी आहे.

भारतीय रेल्वेमधील विनातिकीट प्रवाशांकडून दंडाच्या स्वरुपात वसूल करण्यात आलेली रक्कम गेल्या तीन वर्षांत 30 टक्क्यांनी वाढली आहे. माहितीच्या अधिकारा अंतर्गत ही माहिती समोर आल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. 2016 ते 2019 या तीन वर्षांच्या कालवधीत रेल्वेने एक हजार 377 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे.

गेल्या दहा महिन्यांत तर तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या 89 लाख जणांची धरपकड करण्यात आली आहे. जून 2019 मध्ये इस्रायलची लोकसंख्या 90 लाखांच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत इस्रायलच्या लोकसंख्येइतक्या प्रवाशांनी भारतीय रेल्वेने फुकट प्रवास केला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

खरं तर ही विनातिकीट प्रवास करताना पकडल्या गेलेल्या प्रवाशांची ही आकडेवारी आहे. म्हणजेच ‘पकडा गया वो चोर’ या न्यायाने पकडल्या न गेलेल्या किती जणांनी फुकट प्रवास केला असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार इस्रायल जगात 101 व्या क्रमांकावर आहे. मात्र भारतातील विनातिकीट प्रवाशांची संख्या कदाचित 92 व्या क्रमांकावरील यूएईपेक्षा (94 लाख) जास्त असेल.

संसद रेल्वे अधिवेशन समितीने विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेच्या बुडणाऱ्या महसूलाविषयी 2018 मध्ये चिंता व्यक्त केली होती. गेल्या काही वर्षांत अशाप्रकारे रेल्वेचा किती महसूल बुडाला असेल, याचा शोध घेणं कठीण आहे.

मेट्रोमध्येही डोकं लढवून फुकटेगिरी

रेल्वेमध्ये टीसीने पकडलं, तर विनातिकीट प्रवासी अडकू शकतो. मात्र मेट्रोमध्ये फुकट्यांना प्रवेश करणं कठीण आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकत आहात. कारण जून 2018 ते जून 2019 या कालावधीत दिल्ली मेट्रोमध्ये 41 हजार 366 जणांनी फुकट प्रवास करण्याचा प्रयत्न केला होता. विनातिकीट प्रवाशांकडून तिकीटाच्या रकमेसोबत त्याच्या दहापट दंड वसूल करण्याचा नियम आहे. त्यानुसार त्यांच्याकडून 53.77 लाख रुपये दंड घेण्यात आला.

मेट्रोमध्ये ही फुकटेगिरी कशी चालत असेल, तर एकाच वेळी गेटमधून दोघांनी पास होणं, बिघाड झालेल्या गेटमधून निघून जाणं, पालकांनी आपल्या लहानग्यांना गेटच्या खालून जायला लावणं असे असंख्य जुगाड करुन मेट्रोमधून फुकटे प्रवासी निसटत असल्याचं समोर आलं आहे.