Rajnikanth | कोरोनाचा धसका, तब्बेतीची काळजी, ‘थलायवा’ रजनीकांतचे चित्रपट लांबणीवर!

| Updated on: Nov 14, 2020 | 11:23 AM

कोरोना काळातील लॉकडाऊननंतर जवळपास सर्व चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू केले जात आहे.

Rajnikanth | कोरोनाचा धसका, तब्बेतीची काळजी, ‘थलायवा’ रजनीकांतचे चित्रपट लांबणीवर!
Follow us on

मुंबई : कोरोना काळातील लॉकडाऊननंतर जवळपास सर्व चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू केले जात आहे. मात्र, ‘थलायवा’ रजनीकांत  यांच्या आगामी ‘अन्नाथे’ (Rajinikanth Upcoming film Annaatthe) चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रजनीकांत यांच्या तब्येतीची काळजी घेऊन चित्रपट पूर्ण केला जाणार आहे. पुढच्या वर्षीपर्यंत चित्रपट पुन्हा सुरू करण्याची निर्मात्यांची योजना नसल्याचे कळते आहे (Rajinikanth Upcoming film Annaatthe Shooting postponed).

कोरोना महामारीच्या काळात सुपरस्टार रजनीकांत यांना आपले आरोग्य धोक्यात घालायचे नाही, असे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी चित्रीकरण थांबवायचे ठरवले आहे. परंतु, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सरुथाई शिव दिग्दर्शित ‘अन्नाथे’ या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, खुशबू सुंदर, मीना, कीर्ती सुरेश आणि नयनतारा या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सन पिक्चर्स यांनी केले असून, यामध्ये प्रकाश राज, सोरी आणि सतीश हे सहय्यक कलाकार म्हणून झळकणार आहेत.

लवकरच चित्रीकरण सुरू होईल…

हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले शूटिंग वेळापत्रक पूर्ण केले होते. लॉकडाऊन आधी कलाकार आणि क्रू मेंबर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परदेश दौर्‍यावर जातील, अशी घोषणा करण्यात आली होती. निर्मात्यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये पसरले होते.मात्र, निर्मात्यांनी हे वृत्त फेटाळून लावत अफवा असल्यचे सांगितले. ‘या चित्रपटाविषयी अफवा पसरवल्या गेल्या आहेत. मात्र, असे काहीच नसून लॉकडाऊन संपल्यानंतर लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरू केले जाईल’, असे आश्वासन निर्मात्यांनी यावेळी दिले (Rajinikanth Upcoming film Annaatthe Shooting postponed).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्ला

मध्यंतरी सोशल मीडियावर रजनीकांत यांच्याविषयीचे एक पत्र व्हायरल झाले होते. त्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली होती. या पत्रात रजनीकांत यांच्या आरोग्याविषयी आणि त्यांना डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याविषयी माहिती देण्यात आली होती. तसेच, रजनीकांत त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत पुनर्विचार करु शकतात, असेही म्हटले गेले होते.

संबंधित पत्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत आपल्या राजकीय प्रवेशावर पुनर्विचार करत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या किडनीची स्थिती खराब असल्याने डॉक्‍टरांनी रजनीकांत यांना हालचाल आणि दीर्घ प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर प्रवास करणे धोकादायक असल्याचे सांगितले होते. कोरोनाची लस हाच कोरोनावरील एकमेव उपाय आहे. ती येईपर्यंत कोरोनाचा धोका कायम असेल. रजनीकांत यांचे शरीर कोरोनाशी लढू शकेल की नाही, याविषयी डॉक्टरांनी काळजी व्यक्त केल्याचे या पत्रात म्हटले होते.

(Rajinikanth Upcoming film Annaatthe Shooting postponed)