पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? : सदाभाऊ खोत

| Updated on: Jan 15, 2021 | 8:04 PM

पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? असा सवाल करत कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी टीकास्त्र सोडलं.

पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? : सदाभाऊ खोत
Follow us on

वर्धा : पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? असा सवाल करत कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी टीकास्त्र सोडलं. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यांना पुराशी देणंघेणं नसून, कोरडी सहानुभूती दाखवत आहे, असा आरोप त्यांनी केला. ते वर्ध्यात बोलत होते. वर्ध्यातील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला सदाभाऊ खोत आले होते. यावेळी खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला.

“कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्याला पुराचा तडाखा बसला आहे. कोल्हापूरला सर्वाधिक तडाखा बसला. या पुराने आपल्याला शिकवण दिली आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीवाले राजकारण करत आहे. पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय”, अशी बोचरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

“या पुराचं राजकारण करु नये. हे संकट निसर्गनिर्मित आहे. भविष्यकाळात असं संकट आल्यास सक्षमपणे तोंड देण्यासाठी नियोजन करावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या पुराशी देणंघेणं नाही. त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. हे काम राष्ट्रवादी मोठ्या तडफेने करत आहे, कारण पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं कोरडी सहानुभूती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे”, असं सदाभाऊ म्हणाले.

2005 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महापूर आला होता, तेव्हा पर्यायी व्यवस्थेवर काम का केलं नाही? राष्ट्रवादीचे नेते लोकांची मनं भडकवण्याचं काम करत आहेत, मदत नाही, असा आरोप त्यांनी केला.

मदत करायची असेल तर जनावरांना चारा पोहोचवा, एक दोन गाव दत्तक घ्या, गावं उभी करण्याची काम करा. 2005 मध्ये त्यांचं सरकार असताना किती मदत द्यायचे याचे आकडे यांनी जाहीर करावे. आम्ही मदत वाढवली आहे. पण मदत न करता विभागात फिरायचं, भाषण द्यायची, मुलाखती देत फिरत आहेत. पुढील आमदारकीच्या जागा कशा वाढतील, या दृष्टीने राष्ट्रवादीवाले काम करत आहेत, असं टीकास्त्र सदाभाऊ खोत यांनी सोडलं.

ज्यावेळी महापूर आला तेव्हा आले असते, पाण्यात उतरले असते, चार दोन बोटी घेऊन आले असते तर स्वागत केलं असतं. लोकांचे अश्रू पुसायचा त्यांचा कार्यक्रम नाही. लोकांची मनं भडकवून सरकारविरोधी वातावरण तयार करायचं काम राष्ट्रवादीवाले करत आहेत, असंही सदाभाऊ म्हणाले.

राष्ट्रवादीला शेतकऱ्यांचा पुळका असता तर मावळमध्ये आलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला नसता. तेव्हा प्रेम कुठं गेलं होतं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता हे सगळे रिकामटेकडे निवडणूक डोळ्यापुढ ठेवून लोकांची मनं भडकवण्याचं काम करत आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असंही सदाभाऊ म्हणाले.

भविष्यकाळात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय उपाययोजना करायला हवी, या दृष्टीनं शासनाने जनतेला सोबत घेऊन नियोजन करावं लागणार आहे. 56 फुटापर्यंत पाणी आलं, त्यामुळे या उंचीपर्यंत पाणी आल्यास किती गावं पाण्याखाली जातात, याचा आराखडा तयार करावा लागणार आहे. लोकांना बाहेर पडण्याचे पर्यायी मार्ग तयार करावे लागणार आहे. मोठ्या संख्येतील लोक बोटीच्या माध्यमातून स्थलांतरीत करणं अशक्य होतं. त्यामुळं पर्यायी मार्ग निर्माण करावे लागतील. पुलांच्या उंची वाढवाव्या लागतील, असं त्यांनी नमूद केलं.

 नुकसान भरपाई

शेतकरी, शेतमजूर शहरातील यांना तातडीनं 15 हजार, ग्रामीण भागात स्वयंअर्थसहाय्य म्हणून 10 हजार वाटत आहोत. पाच हजार रुपये रोखीने देत आहे. 1000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला 50 हजार, 1000 वर लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला 1 लाख रुपये स्वच्छतेसाठी देत आहे.

पूर्वीच्या सरकारपेक्षा मदत वाढविली आहे. मृत्यू झालेल्या जनावरांकरिता 30 हजार, चार जनावरपर्यंत मदत देत आहे. घरांसाठी तातडीनं एक लाख, पानपट्टीधारक इतरांना 50 हजार रुपये देत आहे, असं सांगत राष्ट्रवादी राजकारणाचा फार्स करत आहे, इथं राजकारण करू नये, हा मदतीचा काळ आहे, असंही खोत म्हणाले.