अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या भावाची हत्या, चौघांना अटक

| Updated on: Feb 10, 2020 | 12:06 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यकाचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या भावाची हत्या, चौघांना अटक
Follow us on

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यकाचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे (NCP Leader Murder). आनंदराव पाटील यांच्या हत्येसाठी आरोपींनी 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अरविंद पाटील, लक्ष्मण मडीवाल, दत्ता जाधव,अतुल जाधव यांना अटक केली (NCP Leader Murder).

अरविंद पाटील आणि लक्ष्मण मडीवाल यांनी पुण्यातील दत्ता जाधव आणि अतुल जाधव यांना आनंदराव पाटलांना जीवे मारण्याची सुपारी दिली होती. जुन्या राजकीय आणि वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. त्यासाठी अरविंद पाटील आणि लक्ष्मण मडीवाल यांनी दत्ता जाधव आणि अतुल जाधव यांना 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं.

नेमकं प्रकरण काय?

आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू होते. आनंद पाटील हे 2 फेब्रुवारीला सांगलीतील पलूस तालुक्यातील खटाव गावापासून काही अंतरावर ब्रह्मनाळ गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या त्यांच्या शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. काम आटोपून दुपारी बारा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घराकडे परतत असताना, वाटेत दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. पाटील यांना रक्तबंबाळ करुन हल्लेखोर पळून गेले. आनंदराव पाटील यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती.

या हल्ल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले.  त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कोण आहेत आनंदराव पाटील?

गेल्या तीस वर्षापासून आनंदराव पाटील हे राजकारणात सक्रिय होते. आर आर पाटील यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. आनंदराव पाटील हे 10 वर्ष खटाव गावचे सरपंच होते. तासगाव मार्केट कमिटीचेही ते संचालक होते.

तासगावमधील रामानंद भारती सूत गिरणीचे ते विद्यमान संचालक होते. तासगाव आणि पलूस परिसरात  राजकीय क्षेत्रात आनंदराव पाटील यांचा दबदबा होता.