तब्लिग कनेक्शन : अहमदनगरमध्ये 29 परदेशी नागरिक सापडले, धार्मिक स्थळांवर गुन्हा

| Updated on: Apr 01, 2020 | 5:25 PM

राजधानी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या 'तब्लिग जमात'च्या कार्यक्रमात अहमदनगरमधून 46 जण सहभागी झाले होते (Tablighi Jamaat follower Foreign Citizens found hiding in Ahmednagar)

तब्लिग कनेक्शन : अहमदनगरमध्ये 29 परदेशी नागरिक सापडले, धार्मिक स्थळांवर गुन्हा
Follow us on

अहमदनगर : परदेशी नागरिकांचा ठावठिकाणा लपवून ठेवणाऱ्या अहमदनगरमधील धार्मिक स्थळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘तब्लिग जमात’च्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 29 परदेशी नागरिकांना नेवासा, जामखेड आणि मुकुंदनगर भागातील धार्मिक स्थळांमध्ये लपवण्यात आलं होतं. (Tablighi Jamaat follower Foreign Citizens found hiding in Ahmednagar)

राजधानी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘तब्लिग जमात’च्या कार्यक्रमात अहमदनगरमधून 46 जण सहभागी झाले होते. यापैकी 29 परदेशी नागरिक अहमदनगरला परत आले. उर्वरित 17 जण हे अहमदनगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत.

नेवासा, जामखेड आणि मुकुंदनगर भागातील धार्मिक स्थळांमध्ये परदेशी नागरिकांना लपवून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जामखेडमधील तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालाने स्पष्ट झाले होते. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता आठ झाली असून त्यापैकी एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने आता या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याची मोहिम गतिमान केली आहे.

त्याचबरोबर, जिल्ह्यात 23 मार्चपर्यंत परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन तपासणी करण्यात येत आहे. परदेशातून आलेल्या व्यक्ती ज्या व्यकींच्या संपर्कात आल्या, त्यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेने होती घेतले आहे. (Tablighi Jamaat follower Foreign Citizens found hiding in Ahmednagar)

कोरोनाची लक्षणे जाणवत असतील, तर तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. विनाकारण माहिती लपवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

जामखेड येथील एका धार्मिक स्थळात थांबलेल्या परदेशी नागरिकांपैकी दोघा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे याआधीच स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्या सहकार्‍यांची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या जामखेडमधील व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्या सहकार्‍यांच्या स्त्राव नमुने चाचणी अहवालात ते कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे कालच्या अहवालातून स्पष्ट झाले. (Tablighi Jamaat follower Foreign Citizens found hiding in Ahmednagar)