दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित तेलंगणाच्या सहा जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

| Updated on: Mar 31, 2020 | 7:51 AM

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तेलंगणाहून 20 भाविकांचा जत्था गेला होता. त्यापैकी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला (Telangana people who attended Nizamuddin congregation Dies of Coronavirus)

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित तेलंगणाच्या सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू
Follow us on

नवी दिल्ली : निजामुद्दीन परिसरातील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेलेल्या तेलंगणामधील सहा जणांचा मृत्यू ‘कोरोना’मुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक भाविक उपस्थित असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. (Telangana people who attended Nizamuddin congregation Dies of Coronavirus)

दिल्लीतील या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तेलंगणाहून 20 भाविकांचा जत्था गेला होता. त्यापैकी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती तेलंगणा सरकारने दिली.

13 ते 15 मार्च दरम्यान दिल्लीच्या मर्कजमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या तेलंगणामधील सहा जणांचा कोरोना संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला. गांधी हॉस्पिटलमध्ये दोघांचा, तर अपोलो हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, निजामाबादमधील रुग्णालय आणि गडाडवालमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला, असं परिपत्रक तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलं आहे.

हेही वाचा : Corona : आपण कोरोना विषाणूच्या ‘स्टेज थ्री’च्या उंबरठ्यावर, प्रदीप आवटेंचा इशारा

दिल्लीतील निजामुद्दीन भागातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या व्यक्तींनी आपणहून पुढे यावे, त्यांना कोणी काहीही बोलणार नाही, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यांच्यावर विनाशुल्क उपचार केले जातील, असे आवाहन तेलंगणा सरकारने केले आहे. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथके तयार केली आहेत. ही पथकं दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांचा शोध घेतील.

एकाएकी सहा रुग्णांचा कोरोना संसर्गाने मृत्यू होणं, ही तेलंगणासाठी चिंतेची बाब आहे. ​​मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कालच परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं जाहीर केलं होतं. नवीन प्रकरण समोर न आल्यास तेलंगणा 7 एप्रिलपर्यंत ‘कोरोना’मुक्त होईल, असा दावा त्यांनी केला होता. एका व्यक्तीव्यतिरिक्त इतर सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचेही ते म्हणाले होते.