मुंबईत वृद्धेची धारदार शस्त्राने हत्या, 19 तोळे सोने लंपास, पुतण्या ताब्यात

| Updated on: Sep 07, 2020 | 5:54 PM

कुर्ला पूर्वेत रविवारी मध्यरात्री एका चोरट्याने दागिन्यांसाठी 60 वर्षीय महिलेच्या घरात शिरुन तिची निघृण हत्या केली. (Thief murder 60 year old woman in Kurla).

मुंबईत वृद्धेची धारदार शस्त्राने हत्या, 19 तोळे सोने लंपास, पुतण्या ताब्यात
Follow us on

मुंबई : कुर्ला पूर्वेत रविवारी मध्यरात्री एका चोरट्याने दागिन्यांसाठी 60 वर्षीय महिलेच्या घरात शिरुन तिची निघृण हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुर्ला पूर्वेतील जागृती नगर परिसरातील वर्षा सोसायटीत ही घटना घडली. या घटनेप्रकरणी नेहरु नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एका संशयिताला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा संशयित आरोपी महिलेचा पुतण्याच आहे (Thief murder 60 year old woman in Kurla).

जरीना अन्वर शेख असं मृत महिलेचं नाव आहे. त्या आजारी असल्याने वर्षा सोसायटीतील 207 क्रमांच्या फ्लॅटमध्ये एकट्याच वास्तव्यास होत्या. जरीना यांची मुलगी येऊन-जाऊन त्यांची देखभाल करायची (Thief murder 60 year old woman in Kurla).

दरम्यान, काल (6 सप्टेंबर) मध्यरात्री जरीना यांच्या घरात एक अज्ञात व्यक्ती शिरला. त्याने धारधार शस्त्राने जरीना यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जरीना यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या अंगावरील आणि घरातील जवळपास 19 तोळे दागिने घेऊन पळ काढला. या दागिन्यांची किंमत 5 लाख 70 रुपये इतकी आहे. या दागिन्यांसाठी चोरट्याने जरीना यांचा जीव घेतला.

दरम्यान, जरीना यांच्या हत्येची माहिती मिळताच नेहरु नगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वर्षा इमारत आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरटा जरीना यांचा पुतण्याच असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तातडीने संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास नेहरु नगर पोलीस करत आहेत, अशीदेखील माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा :

बुलडाण्यात दहा रुपयांच्या उधारीसाठी दारु विक्रेत्याने एकाला पेट्रोल टाकून जिवंत पेटवलं, गुन्हा दाखल

जेलरला बंदूक दाखवून पळालेला जळगावचा कुख्यात आरोपी बोईसरमध्ये जेरबंद