कॅनडातील टोरंटो हेच माझं घर, अक्षय कुमारचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरुन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. अखेर अक्षय कुमारने या सर्व गदारोळावर अखेर स्पष्टीकरण दिले आहे. “मी गेल्या सात वर्षात माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचं कधीही लपवलं नाही, मग आत्ताच हा सर्व वाद का काढला जातोय”, असा सवाल अक्षय कुमारने केलाय. शिवाय मी […]

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरुन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. अखेर अक्षय कुमारने या सर्व गदारोळावर अखेर स्पष्टीकरण दिले आहे. “मी गेल्या सात वर्षात माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचं कधीही लपवलं नाही, मग आत्ताच हा सर्व वाद का काढला जातोय”, असा सवाल अक्षय कुमारने केलाय. शिवाय मी देशासाठी माझ्या वतीने योगदान देत राहिल, असंही अक्षय कुमारने म्हटलंय. मात्र, याच दरम्यान सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात अक्षय कुमार टोरंटो हेच आपलं घर असल्याचं सांगत आहे.
या व्हिडीओत अक्षय कुमार काय म्हणतो?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत अक्षय कुमार आपल्या रिटायरमेंट प्लॅनबद्दल बोलत आहे. “मला तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे की, हे (टोरंटो, कॅनडा) माझं घर आहे. टोरंटो माझं घर आहे. निवृत्तीनंतर मी इथे परत येईन आणि इथेच राहीन.”, असे अक्षय कुमार सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ अक्षय कुमारने काल दिलेल्या स्पष्टीकरणाच्या ट्वीटखाली माजी बँकर तारिक अन्वर यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडीओतील अक्षय कुमारचे भाषण नेमके कधीचे आहे, हे स्पष्ट नसलं, तरी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ :
“Toronto is my home, after I retire from this industry I will settle in Canada” pic.twitter.com/Ypet1U0oBJ
— Tarique Anwer (@tanwer_m) May 3, 2019
अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
“माझ्या नागरिकत्वाबाबत अनावश्यक आणि नकारात्मक गोष्टी का पसरवल्या जात आहेत हे मला समजत नाही. माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे हे मी गेल्या सात वर्षात कधीही लपवलेलं नाही किंवा नकारही दिलेला नाही. त्याचप्रमाणे मी गेल्या सात वर्षात कधीही कॅनडाला गेलेलो नाही हे देखील तेवढंच खरं आहे. मी भारतात काम करतो आणि सर्व प्रकारचे करही भारतातच भरतो. या गेल्या काही वर्षांमध्ये माझं देशाविषयीचं प्रेम सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर कधीही आलेली नाही. पण गरज नसताना माझ्या नागरिकत्वाचा मुद्दा मध्ये ओढला जातोय हे पाहून दुःख होतंय. हा मुद्दा वैयक्तिक, कायदेशीर, अराजकीय आणि इतरांशी काहीही संबंध नसलेला आहे. माझा भारत आणखी मजबूत बनवण्यासाठी मी कायम योगदान देत राहिन एवढंच सांगतो,” असं स्पष्टीकरण अक्षय कुमारने दिलंय.
अक्षय कुमार नेमका कोणत्या देशाचा नागरिक?
मानद नागरिकत्व (Honorary Citizenship) हे एखाद्या देशाकडून सन्मान म्हणून दिलं जातं. मानद नागरिकत्व दिलं म्हणजे सामान्य नागरिकत्वाचे अधिकार मिळत नाहीत. म्हणजेच एखादा व्यक्ती कॅनडाचा Honorary Citizenship असेल तर त्यालाही कॅनडात जाण्यासाठी व्हिजा आवश्यक असेल.
अकॅडमन डॉट इन या वेबसाईनुसार, अक्षय कुमारच्या नागरिकत्वावर केंद्रीय गृहमंत्रालयाने यापूर्वीच आरटीआयला उत्तर दिलेलं आहे. अक्षय कुमार हा Overseas Citizenship of India आहे की भारतीय नागरिक आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो Overseas Citizenship of India नसल्याचं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं. ऑगस्ट 2017 मध्ये आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं, की अक्षय कुमार हा भारतीय नागरिक आहे.