मध्येच वाजलेल्या अधिकाऱ्याचा मोबाईल जप्त, नो जीन्स, क्लीन शेव्ह, तुकाराम मुंढेंची कडक शिस्त!

| Updated on: Feb 19, 2020 | 5:39 PM

आपल्या शिस्तप्रियतेसाठी ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांना चांगलेच शिस्तीचे धडे दिले.

मध्येच वाजलेल्या अधिकाऱ्याचा मोबाईल जप्त, नो जीन्स, क्लीन शेव्ह, तुकाराम मुंढेंची कडक शिस्त!
Follow us on

नागपूर : आपल्या शिस्तप्रियतेसाठी ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांना चांगलेच शिस्तीचे धडे दिले (Tukaram Mundhe on Jeans clean Shave and Mobile). नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने महाराजांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. यावेळी सुरु असलेल्या बैठकीत कर्मचाऱ्याचा मोबाईल मध्येच वाजल्याने त्यांनी तो मोबाईल थेट जप्त केला. त्यांनी कामावर जीन्स घालून येणाऱ्या कर्मचाऱ्यालाही सज्जड दम देत वॉर्निंग दिली. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर ‘क्लीन शेव्ह’ करुन येण्यास बजावले.

आयुक्तपदाची सूत्रं हातात घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी सातत्याने आपल्या कामाचा सपाटा लावला आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या वेळेत नियमांप्रमाणे वागत नागरिकांची अधिकाधिक कामं करावीत, असा आग्रह मुंढे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी शिस्तीचे धडेही देण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून ऐन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशीही अभिवादन केल्यानंतर झालेल्या बैठकीत मुंढे यांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं. बैठकीत सुचना देऊनही एका कर्मचाऱ्याचा मोबाईल मध्येच वाजल्यानंतर त्यांनी तो मोबाईल जप्त केला. तसेच मोबाइल सायलेंट ठेवायला सांगितला होता, तरी अक्कल नाही का? असा थेट सवाल केला.

तुकाराम मुंढे म्हणाले, “प्रत्येक कर्मचाऱ्याने आपाले कर्तव्य जाणून घ्यावे. कर्तव्यपेक्षा आपल्या भूमिका महत्वाच्या आहेत हे लक्षात घ्या. नागपूरच्या समस्या सोडवणे हीच आपली भूमिका असायला हवी. मात्र, आपण भूमिकेपासून दूर आहोत. नागपूर शहराचा विकास करण्यासाठी, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी काम करावं. मात्र तसं होताना दिसत नाही. महापालिकेचा प्रत्येकजण आपल्या विषयात कमिशनर आहे असं समजून त्यानं काम केलं पाहिजे. मात्र, आपण वेगवेगळ्या (विरुद्ध) दिशेने काम करतो आहे. 1951 मध्ये महापालिकेची स्थापना झाली. एवढ्या वर्षांनंतरही अशी परिस्थिती असेल तर ते लांच्छनास्पद आहे.”

माझं काम फक्त सकाळी 10 ते संध्याकाळ 6 एवढंच नाही, असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांचे कानही टोचले. आपण आपल्या कामाकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहात आहोत. शहराच्या विकासाची संधी आहे. फक्त तुम्ही खुर्चीच्या बाहेर पडा. चांगल्या हेतूने काम करत असताना चुका झाल्यास (बोनाफाईड चुका) काही होणार नाही. मात्र, चुकीच्या हेतूने काम करताना चुका झाल्यास (मालाफाईड चुका) सर्विसमधून बाहेर पडावं लागेल, असा सज्जड दम तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना दिला. स्वाभिमानाने जगा. माणूस म्हणून जगा. सर्वांनी आपल्या विभागात संवाद ठेवावा आणि शिस्त ठेवावी, असाही सल्ला तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिला.

Tukaram Mundhe on Jeans clean Shave and Mobile