साताऱ्यात टेरेसवर खेळणाऱ्या चिमुकल्यांवर गांधील माश्यांचा हल्ला, दोन मुलींचा मृत्यू

| Updated on: Oct 27, 2020 | 2:39 PM

पाटणच्या ढेबेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गच्चीवर खेळत असलेल्या लहान मुलांवर गांधील माशांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन लहान मुलींचा मृत्यू झाला आहे. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

साताऱ्यात टेरेसवर खेळणाऱ्या चिमुकल्यांवर गांधील माश्यांचा हल्ला, दोन मुलींचा मृत्यू
Follow us on

सातारा: गांधील माश्या चावल्यानं दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाटण तालुक्यात घडली आहे. पाटणच्या ढेबेवाडी परिसरातील महिंद इथं ही घटना घडली आहे. या दोन्ही मुली घराच्या गच्चीवर खेळत असताना त्यांच्यावर अचानक गांधील माश्यांनी हल्ला केला. यात दोन चिमुकलींचा जीव गेला. अनुष्का दिनेश यादव (वय 12) आणि शेजल अशोक यादव (वय 8) असं मृत मुलींची नावं आहेत. घराजवळ असलेल्या एका पडक्या घराच्या छपराला गांधील माश्यांचं पोळं होतं. या पोळ्याला धक्का लागल्यानं माश्या चवताळल्या आणि त्यांनी गच्चीवर खेळत असलेल्या लहान मुलांवर हल्ला चढवला. मुलांचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी गच्चीवर धावलेल्या अजून पाचजणांना माश्यांनी जखमी केलं आहे. (Two little girls died after Hornet bee attack near Patan, Satara)

मृत मुलींपैकी अनुष्का यादव ही येळगाव, तालुका- कराड इथली असून ती आपल्या आजोळी महिंद इथं आली होती. लहान मुलींच्या अशा अचनाक झालेल्या मृत्यूमुळं महिंद गावासह ढेबेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

कशी असते गांधील  माशी?

गांधील माशीला इंग्रजीत Hornet असं म्हणतात. ही एक मोठी माशी असते. जर्द पिवळ्या रंगाची माशी गांधीलमाशी म्हणून ओळखली जाते. ही माशी जोरदार डंख मारते. अनेकवेळा डंख मारल्याने जीवघेणी दुखापत होते. गांधील माश्यांचे पोळे हे लहान असते. ते बरेचदा मातीने बनवलेले असते. या माशीच्या पोळ्यावर हल्ला केल्याने त्या अधिक हिंस्र होतात.

Two little girls died after Hornet bee attack near Patan, Satara