महिलांच्या प्रवेशानंतर शबरीमाला मंदिर शुद्धीकरणासाठी बंद

सचिन पाटील

|

Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

तिरुअनंतपूरम: केरळमधील शबरीमाला मंदिरात आज ऐतिहासिक घटना घडली. सुमारे 40 वर्षीय दोन महिलांनी बंदी झुगारुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन दर्शन घेतलं. बिंदू आणि कनकदुर्गा या क्रांतीकारी महिलांनी मध्यरात्रीपासून मंदिराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पहाटे 3.45 च्या सुमारास मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. या महिलांसोबत काही पोलीस आणि अधिकारी होते. मात्र महिलांनी मंदिर प्रवेश करताच […]

महिलांच्या प्रवेशानंतर शबरीमाला मंदिर शुद्धीकरणासाठी बंद

Follow us on

तिरुअनंतपूरम: केरळमधील शबरीमाला मंदिरात आज ऐतिहासिक घटना घडली. सुमारे 40 वर्षीय दोन महिलांनी बंदी झुगारुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन दर्शन घेतलं. बिंदू आणि कनकदुर्गा या क्रांतीकारी महिलांनी मध्यरात्रीपासून मंदिराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पहाटे 3.45 च्या सुमारास मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. या महिलांसोबत काही पोलीस आणि अधिकारी होते. मात्र महिलांनी मंदिर प्रवेश करताच मंदिर प्रशासनाने शुद्धीकरणासाठी मंदिर बंद केलं.

सुप्रीम कोर्टानं आदेश देऊनही महिलांना शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. महिलांना या मंदिरामध्ये शेकडो वर्षांपासून बंदी आहे. पण ही बंदी अन्यायकारक आणि भेदभाव करणारी असल्याचं सुप्रीम कोर्टानं दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. मात्र स्थानिक आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळं या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. अनेक महिलांनी प्रवेशाचा प्रयत्न केला, पण त्यांना वेळोवेळी रोखण्यात आलं.तिथल्या राज्य सरकारनं पोलीस बंदोबस्त ठेवून महिलांना मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला. पण तोही असफल झाला. मंदिर प्रशासनानं विरोधाची भूमिका कायम ठेवल्यामुळं आणि हिंदुत्वावाद्यांच्या आक्रमकतेमुळं सरकारला जबरदस्ती करण्यातही अडचणी आल्या.पण आज हे सारं गळून पडलं. पहाटे पावणे चार वाजता क्रांती घडली आणि दोन महिलांनी मंदिरात प्रवेश केला.

पंतप्रधानांच्या मुलाखतीत शबरीमाला मंदिराचा उल्लेख

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शबरीमाला मंदिराबाबत भाष्य केलं. मोदींना शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत विचारण्यात आलं. त्यावर मोदी म्हणाले, “शबरीमालाच नाही तर देशात अनेक मंदिरं आहेत जिथे परंपरेनुसार पुरुषांना प्रवेश नाही. तिथे त्याचं पालन केलं जातं. त्याबाबत कोणाला आक्षेप नाही. जर लोकांची श्रद्धा असेल की शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जाऊ नये, तर त्याबाबत काळजी घ्यायला हवी. महिला न्यायमूर्तींनी शबरीमाला मंदिराबाबत जो निर्णय दिला आहे, तो सुद्धा लक्षात घ्यायला हवा”

सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय होता?

शबरीमाला मंदिरात महिला प्रवेशबंदीप्रकरणी 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. त्यानुसार शबरीमाला मंदिरात कोणत्याही वयाच्या महिलेला प्रवेशापासून रोखू शकत नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिला होता. 4 न्यायमूर्ती बाजूने 1 न्यायमूर्तीचा विरोधात निर्णय होता. त्यामुळे बहुमताने महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय झाला होता.

महिला न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी महिलांना शबरीमाला मंदिर प्रवेश देण्यास विरोध केला होता.

 यापूर्वीही मंदिर प्रवेशाचा प्रयत्न

यापूर्वी 23 डिसेंबर रोजी  11 महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या महिलांचा प्रयत्न कट्टरवाद्यांनी हाणून पाडला होता. 10 ते 50 वर्षापर्यंतच्या या महिला भगवान अयप्पांच्या दर्शनासाठी पंबा शहरात पहाटे 5.30 वाजता पोहोचल्या होत्या. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही त्यांना मंदिरात जाऊ दिलं नव्हतं.

शबरीमाला मंदिर वाद

केरळमधील शबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्षीय महिलांना प्रवेशबंदी आहे. पंरपरेनुसार भगवान अयप्पा ब्रह्मचारी होते त्यामुळे महिलांना या मंदिरात प्रवेशबंदी होती. मासिक पाळीमुळे महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ स्थापून 4-1 ने निर्णय दिला होता. शबरीमाला मंदिरातील प्रवेशापासून कोणत्याही वयाच्या महिलांना रोखू शकत नाही, असा निर्णय कोर्टाने दिला. या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठात तत्कालिन सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती नरीमन, न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांचा समावेश होता.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI