हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ शब्द पाळला

| Updated on: Feb 24, 2020 | 9:13 PM

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडित कुटुंबाला दिलेला शब्द पाळला आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तो शब्द पाळला
Follow us on

वर्धा : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडित कुटुंबाला दिलेला शब्द पाळला आहे (Uddhav Thackeray on Hinganghat promise). या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलेल असा शब्द दिला. हा शब्द पाळत सरकारने पीडितेच्या उपचारासाठी 5 लाख 43 हजार 441 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून रुग्णालयाला दिले. पीडितेच्या उपचारासाठी सुरुवातीला कुटुंबीयांकडून 60 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला होता. हा खर्च देखील पीडितेच्या कुटुंबीयांना परत करण्यात आला. राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळत 60 हजार रुपयांचा धनादेश पीडितेच्या वडिलांकडे सुपूर्द केला आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख सदस्य सचिव डॉ. कमलेश सोणपूरे यांनी आज (24 फेब्रुवारी) हिंगणघाट येथे जाऊन हिंगणघाटच्या उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. त्यानंतर उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी हा धनादेश कुटुंबीयांकडे सोपवला.

दरम्यान, हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या पीडितेच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या दृष्टीने पीडितेच्या उपचाराचा रुग्णालयाकडून 11 लाख 90 हजार रुपयांचा अंदाजित खर्च शासनाला देण्यात आला होता. यानुसार सुरुवातीलाच राज्य शासनाने 4 लाख रुपये आणि नंतर 1 लाख 43 हजार 441 रुपये मंजूर केले. अशाप्रकारे मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णालयाला एकून 5 लाख 43 हजार 441 रुपये देण्यात आले. मात्र, पीडितेचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.

या घटनेनंतर पीडितेच्या परिवाराला लागलेला खर्च शासनाने परत देत आपली संवेदना राखली आहे. दुसरीकडे सरकारकडून राज्यात लवकरच दिशा कायदा व्हावा यासाठी देखील पाऊल उचललं जात आहे. राज्य सरकारने अशाप्रकारे वेळेत मदत पोहचवत आपली जबाबदारी पार पाडल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे.

Uddhav Thackeray on Hinganghat promise