‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही तर प्रत्युत्तर देऊ, ट्रम्प यांचा भारताला इशारा

| Updated on: Apr 07, 2020 | 8:55 AM

'हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा चालू ठेवला तर मी कौतुकच करेन. पण पुरवठा थांबला तर प्रत्युत्तर द्यावे लागेल' असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले (Donald Trump hints at retaliation towards India)

हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही तर प्रत्युत्तर देऊ, ट्रम्प यांचा भारताला इशारा
Follow us on

वॉशिंग्टन : ‘कोरोना व्हायरस’च्या रुग्णांवरील उपचारांमध्ये वापरले जाणारे मलेरियावरील औषध ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी भारताने उठवली नाही, तर प्रत्युत्तर देण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला. गेल्याच महिन्यात भारत भेटीवर आलेली ट्रम्प यांनी सूडाची भाषा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Donald Trump hints at retaliation towards India)

‘कोरोना व्हायरस टास्कफोर्स’ विषयी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलत होते. ‘हायड्रोक्लोरोक्विनच्या निर्यातीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंदी घातली आहे. तुम्ही काही प्रत्युत्तराचा विचार करताय का?’ असा प्रश्न यावेळी ट्रम्प यांना विचारण्यात आला.

‘भारताचे अमेरिकेशी चांगले संबंध आहेत. औषध निर्यातीवरील बंदी न उचलण्यामागे आपल्याला तरी कोणतेही ठोस कारण दिसत नाही’, असं ट्रम्प म्हणाले. “हा त्यांचा (मोदींचा) निर्णय होता, हे ऐकिवात नाही. मला माहित आहे की त्यांनी इतर देशांसाठी ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मी काल त्यांच्याशी (मोदी) बोललो, खूप चांगली चर्चा झाली. एकमेकांना सहकार्य करायचे ठरवले. आता ते (भारत) काय ठरवत आहेत, आपण पाहू’ असं ट्रम्प पुढे म्हणाले. (Donald Trump hints at retaliation towards India)

अमेरिकेसाठी ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवण्याच्या विनंतीवर आम्ही विचार करु, असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या फोनवरील संभाषणात दिल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा चालू ठेवला तर मी कौतुकच करेन. पण पुरवठा थांबला तर तुम्ही म्हणताय तसे प्रत्युत्तर द्यावे लागेल. आणि प्रत्युत्तर तरी का देऊ नये?’ असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला.

‘कोरोना व्हायरस’ने जगभरात थैमान घातल्याने अमेरिकेसारख्या महासत्तेच्याही नाकी नऊ आले आहेत. अमेरिकेत एकाच दिवशी 1200 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकेत एकूण बळींचा आकडा 10 हजारांच्या पुढे गेला आहे. सध्या अमेरिकेत सर्वाधिक 3 लाख 66 हजार 112 कोरानाग्रस्त रुग्ण आहेत. (Donald Trump hints at retaliation towards India)