ऑनलाईन शिक्षणाचा ‘व्हीस्कूल पॅटर्न’, महाराष्ट्रातील दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना मोफत

| Updated on: Jul 16, 2020 | 8:20 AM

वोपा या संस्थेने ग्रामीण भागातील 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्ही स्कूल (V School) हा उपक्रम मोफत सुरु केला आहे (V School online education platform).

ऑनलाईन शिक्षणाचा व्हीस्कूल पॅटर्न, महाराष्ट्रातील दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांना मोफत
Follow us on

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सर्वच ठिकाणी शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न उभा राहिला. यावर उपाय म्हणून शहरांमध्ये ऑनलाईन माध्यमांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आहे. त्यासाठी शहरांमध्ये संसाधनंही उपलब्ध होताना दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती पाहता महागड्या ऑनलाईन शिक्षणाचे पर्याय परवडणारे नाहीत. हीच गरज ओळखून ‘वॉवेल्स ऑफ द पिपल असोसिएशन’ (वोपा) या संस्थेने अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व्ही स्कूलचा (V School) उपक्रम सुरु केला आहे (V School online education platform).

व्ही स्कूल (VSchool) प्लॅटफॉर्ममुळे राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य होत आहे. बीड जिल्हा प्रशासन आणि वोपा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम विकसित करण्यात आला आहे. यामुळे आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळातही आपलं दहावीचं शिक्षण सुरु ठेवता आलं.

ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेली वीज, मोबाईल अशा गोष्टींची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. शिवाय ऑनलाईन शिक्षणाचे महागडे ॲप सामान्य विद्यार्थी व पालकांना परवडू शकत नाहीत, परिणामी असे विद्यार्थी भविष्यातील स्पर्धेत मागे पडतील. पण असे होऊ नये म्हणून बीड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी राहूल रेखावर आणि अजित कुंभार यांच्या मदतीने पुण्यातील वॉवेल्स ऑफ द पिपल असोसिएशन (वोपा) या सामाजिक संस्थेने विविध तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने राज्यातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक प्लॅटफॉर्म सुरु केला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

ठळक वैशिष्ट्ये:

  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन निर्मिती
  • हा प्लॅटफॉर्म कुठल्याही मोबाईलमधील कोणत्याही इंटरनेट ब्राऊजरमध्ये उघडेल
  • फक्त व्हिडिओचा भडिमार नाही, तर फोटो, जीआयएफ आणि इतर रंजक गोष्टींचाही उपयोग
  • एकाच मोबाईलवरुन अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सुविधा (लॉगिन किंवा इंस्टॉल करण्याची गरज नाही)
  • शाळा व शिक्षक यांना यात सक्रिय भूमिका
  • वापरायला एकदम सोप्पे (एक धडा एका पानावर – स्क्रोलिंग)
  • वही, पेन, पुस्तक, परिसर व शिक्षक यांचा योग्य वापर करुन विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी होईल अशी रचना

व्ही स्कूल (VSchool) प्लॅटफॉर्म कसा वापराल?

  1. तुमच्या मोबाईलच्या कुठल्याही ब्राऊझरमध्ये ssc.vopa.in असं टाईप करा.
  2. तुम्हाला व्ही स्कूल ऑनलाईन शिक्षणाचा प्लॅटफॉर्म दिसेल. येथे तुम्हाला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याचे नाव आणि पाठाचा क्रमांक निवडा.
  3. पाठ निवडल्यानंतर काही क्षणात तुम्हाला तो संपूर्ण धडा एकाच पानावर खाली स्क्रोल करून पाहता येईल.
  4. तुमच्या सोयीसाठी प्रत्येक धड्याला काही कृतिसंचांमध्ये विभागले आहे. एका कृतिसंचात तुमच्यासाठी काही सूचना, व्हिडीओ, इमेजेस, ऑनलाईन परीक्षा, घरी करायला गृहपाठ इ. गोष्टी असतील.
  5.  तुम्ही रोज कोणत्या विषयाचे आणि किती कृतीसंच पूर्ण करायचे हे तुम्ही तुमच्या शाळेतील शिक्षकांनाही विचारू शकतात.
  6.  तुम्हाला कोणताही व्हिडीओ पाहण्याआधी किंवा कृती करण्याआधी दिलेल्या सूचना लक्ष देऊन वाचा.
  7. यामध्ये तुम्हाला काही अभ्यास ऑनलाईन टेस्टच्या स्वरुपात असेल, ज्याचे गुण तुम्हाला लगेच समजतील आणि कुठे चुकले हे देखील समजेल. टेस्ट देऊन झाल्यावर शो रिझल्टवर क्लिक करा. काही गृहपाठ हा वहीवर करून तुमच्या शिक्षकांना व्हॉट्सपवर पाठवा आणि त्यांचाही अभिप्राय घ्या.
  8. प्रत्येक धड्याच्या शेवटी तुम्हाला Exit Slip (तुमचा अभिप्राय/ फीडबॅक) भरुन देता येईल.
  9. एखादे पेज व्यवस्थित लोड झाले नाही, एखादा फोटो नीट दिसत नसेल तर पेज रिफ्रेश (लोड) करा.
  10. तुम्ही एखादी इमेज/ आकृती/ नकाशा दोन बोटांनी झूम करून पाहू शकता.
  11. नेहमी व्हिडीओ फुल स्क्रीन मोड मध्ये पहा.

या उपक्रमाविषयी सांगताना वोपा संस्थेचे प्रमुख प्रफुल्ल शशिकांत म्हणाले, “ग्रामीण भागात नवीन फोन किंवा डिजीटल साधनं विकत घेऊन देता येतील अशी अनेक पालकांची परिस्थिती नाही. मग अशा परिस्थितीत त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता यावे याचा विचार करुन या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे शिक्षण नव्हे तर ते शिक्षण पोहोचवण्याचे साधन आहे.”

“ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली अनेक पालकांची आणि शाळांचीही फसवणूक होण्याची शक्यता आहे. अनेक ऑनलाईन एज्युकेशन देणाऱ्या संस्था ऑनलाईन शिक्षणाचे महागडे ॲप पालकांच्या माथी मारत आहेत किंवा बहुतांश शाळा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचं शिक्षण देत आहेत. त्याला गुणवत्तापूर्ण मोफत पर्याय म्हणून व्ही स्कूलची निर्मिती करण्यात आली. हा प्लॅटफॉर्म ऑनलाइन शिक्षणामध्ये एक नवी दिशा देत आहे,” असंही प्रफुल्ल शशिकांत यांनी सांगितलं.

राज्यात दहावीची एकूण 15-18 लाख विद्यार्थी आहेत. या सर्वांना या उपक्रमाचा थेट फायदा होणार आहे. मागील एका महिन्यात या प्लॅटफॉर्मला भेट देणाऱ्यांची संख्या जवळपास 20 लाख झाली आहे. तसेच भेट देणाऱ्यांची संख्या 2 लाखापेक्षा अधिक आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

व्ही स्कूल हा सहकारी पद्धतीचा प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा हेतू

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरु करण्याचं कारण सांगताना वोपाचे संचालक आकाश भोर म्हणाले, “बाजारातील ऑनलाईन शिक्षणाची चांगली साधने प्रती विद्यार्थी 20-50 हजार रुपये शुल्क देऊन घ्यावी लागतात. त्यामुळे ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे असेच विद्यार्थी या प्रकारचं ऑनलाईन शिक्षण सुरु ठेऊ शकतील किंवा त्यांचे पालक त्यांना घरी शिकवतील. त्याचवेळी ज्या विद्यार्थ्यांचे पालक सुशिक्षित नाहीत, पोटापाण्याच्या प्रश्नात अडकलेले आहेत, त्यांच्या पाल्यांना कुठलेही मार्गदर्शन नसेल. शासनाची शाळा सोडली, तर शिकण्याची इतर कुठलीही साधने नसतील.”

“काही महिन्यानंतर शाळा सुरु होतील. दहावी (SSC), बारावी (HSC), सीईटी (CET) इ. परीक्षा काही कालावधीत या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागतील. या गुणांवर अवलंबूनच विद्यार्थ्यांना चांगलं वाईट कॉलेज मिळणार आहे. त्यानुसार शिक्षण मिळणार, त्यानुसार आयुष्याचे पर्याय समोर येणार. म्हणजेच अख्ख्या एका पिढीची शिक्षणातून चांगले आयुष्य जगण्याची न्याय्य संधी व्यवस्थेने हिरावून घेतलेली असेल. या जाणिवेने आम्ही प्रचंड अस्वस्थ झालो,” असं मत वोपाच्या संचालक ऋतुजा सीमा महेंद्र यांनी व्यक्त केलं.

या शैक्षणिक उपक्रमाविषयी बोलताना आंबेजोगाईचे इंग्रजीचे वरिष्ठ शिक्षक श्रीधर नगरगोजे म्हणाले, “आम्ही बालभारती सोबत पुस्तकनिर्मितीचे काम करताना नेहमी तंत्रज्ञानाचा न्याय्य (योग्य) वापर हि संज्ञा वापरायचो, पण हा प्लॅटफॉर्म बनवताना याचा खरा प्रत्यय आला.” बीडमधील पाटोदा तालुक्यात वसलेल्या डोंगरकिन्ही गावातील भक्ती येवले या दहावीच्या विद्यार्थीनीने या ऑनलाईन शिक्षणाबाबत भरभरुन सांगितलं. ती म्हणाली, “माझेही पालक लॉकडाऊनमध्ये माझं शिक्षण कसं होणार याबाबत चिंतेत होते. मात्र, वोपाच्या व्ही स्कूल या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे आई-वडिलांची चिंता मिटली. हा प्लॅटफॉर्म साधासोपा असून अनेक किटकट गोष्टींची कल्पना करण्यास मदत करणारा आहे. वर्गात अनेकदा शिक्षक शिकवताना संबंधित गोष्ट कशी असेल याचा अंदाज यायचा नाही. मात्र, येथे प्रत्येक संकल्पनेला चित्रस्वरुपात दाखवल्यानं शिकणं अधिक आनंद देणारं झालं आहे.”

‘कोरोनानंतरच्या काळात आत्मविश्वासाने स्पर्धा करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्ही स्कूलचा आधार’

विशेष म्हणजे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडे स्वतंत्र मोबाईल उपलब्ध नाहीत. यावर उपाय म्हणून दहावीच्या या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांना सोबत एकत्र बसवून या प्लॅटफॉर्मचा उपयोग केला. अगदी कमी इंटरनेट वेगातही सुरळीतपणे काम करणारा हा प्लॅटफॉर्म या सर्वांनाच शिक्षणापर्यंत घेऊन जाण्याचं काम करत आहे. त्यामुळे शाळांपर्यंत पोहचता येत नाही म्हणून हे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. शहरांमधील संसाधने उपलब्ध असणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे तेही आपलं शिक्षण सुरुच ठेवत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनानंतरच्या परिस्थितीत इतर विद्यार्थ्यांशी स्पर्धा करताना मोठी मदत होणार असल्याच्या प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांचे पालक व्यक्त करत आहेत.

“हा उपक्रम मुद्दामहून बीडमधून सुरु करण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था एकत्र येऊन शिक्षणाचं बाजारीकरण झालेल्या पर्यायांना अधिक गुणवत्तापूर्ण पर्याय देऊ शकतात हे या कामातून दाखवून द्यायचं होतं. या उपक्रमाने हा हेतू पूर्ण झाला.” – वोपा

हा उपक्रम आता केवळ या संस्थेचा राहिला नसून बीडसह राज्यभरातील शिक्षकांचा झाला आहे. शिक्षकांच्या सहभागातून तयार झालेला हा उपक्रम अनेक शिक्षकांना मुलभूत शिक्षण मंच उपलब्ध करुन देत आहे. त्यात शिक्षकांना महत्त्वाची भूमिका आहे. राज्यभरातील शिक्षकांना या शिक्षण सामुग्री निर्मितीत योगदान देण्यासही वाव असल्याने अनेक शिक्षक आपल्या विषयाबाबत अशी सामुग्री या मंचावर पाठवत आहे. याचा राज्यभरातील विद्यार्थ्यांना उपयोग होत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक या उपक्रमाचा वैयक्तिक पातळीवर प्रचार प्रसार करतानाही दिसत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी या उपक्रमासाठी आवाहन करणारे आपले व्हिडीओ दिले. तसेच या उपक्रमाचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा यासाठी आवाहन केलं, अशीही माहिती वोपाने दिली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा पर्याय देणाऱ्या वोपाकडून मदतीचं आवाहन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय देणाऱ्या व्ही स्कूल प्लॅटफॉर्मसाठी मोठ्या प्रमाणात खर्च आला आहे. हा खर्च भागवण्यासाठी वोपाकडून लोकवर्गणीतून निधी उभा केला जात आहे. नागरिकांनी देखील या महत्त्वाच्या कामाला मदत म्हणून आपल्या क्षमतेनुसार आर्थिक योगदान द्यावं. आपण जास्तीत जास्त देणगी देऊन विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवण्यास मदत करावी, असं आवाहन वोपा संस्थेकडून करण्यात आलं आहे. यासाठी 9420650484 या क्रमांकावर संपर्क करण्याची विनंती करण्यात आली आहे. हा निधी मिलाप या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन पद्धतीने उभा केला जात आहे.

वोपा संस्थेची ओळख

वोपाचे प्रमुख प्रफुल्ल शशिकांत आणि त्यांचे टीमने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ एमकेसीएलचे (MKCL) प्रमुख विवेक सावंत यांच्या मार्गर्शनाखाली निर्माण आणि कुमार निर्माण या सामाजिक उपक्रमांचं 5 वर्ष काम केलं. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण घडवून आणणे असे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होतं. यानंतर याच तरुणांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासापासून कोसो दूर असलेल्या भौगोलिक भागात काम करण्यासाठी वोपा या संस्थेची स्थापना केली. शिकणे- शिकवणे अधिक प्रभावी, आनंददायी आणि अर्थपूर्ण व्हावे यासाठी ही संस्था मागील 2 वर्षांपासून ग्रामीण भागातील शिक्षकांचे प्रशिक्षण आणि शाळा व्यवस्थापनात सुधारणा करण्याचे काम करते.

संबंधित बातम्या :

राज्यात शिक्षणाचा नवा “बीड पॅटर्न”, दहावीच्या 47,000 विद्यार्थ्यांना घरबसल्या मोफत शिक्षण

कुष्टरोग्यांपासून हातावर पोट असणाऱ्या मजूरांपर्यंत घरपोच जीवनावश्यक वस्तू, ‘वोपा’ संस्थेचा ‘लाख’मोलाचा पुढाकार

34 वर्षांपासून शासनाच्या अनुदानाशिवाय बीडमध्ये ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ज्ञानार्जनाचं काम

V School online education platform