Vijay Shivtare | अजित पवारांनी नीच पातळी गाठली, आता माघार नाही, मी बारामती लढवणारच – विजय शिवतारेंचा निर्धार

'बारामती मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही. देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे. कोणाची मालकी त्यावर नाही. आपला स्वाभिमान जागृत करून लढायचं' असं सांगत विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय जाहीर केला

Vijay Shivtare | अजित पवारांनी नीच पातळी गाठली, आता माघार नाही, मी बारामती लढवणारच - विजय शिवतारेंचा निर्धार
| Updated on: Mar 13, 2024 | 1:48 PM

पुणे | 13 मार्च 2024 : लोकसभा निवडणूका लवकरच जाहीर होणार असून बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतीलच नेत्याने अजित पवार यांना चॅलेंज दिलंय. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भाष्य केलं. बारामतीमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय विजय शिवतारे यांनी जाहीर केला. यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांचा शिवतारेंना पाठिंबा आहे. त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

‘बारामती मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही. देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे. कोणाची मालकी त्यावर नाही. म्हणून पवार-पवार करण्याएवजी आपण आपला स्वाभिमान जागृत करून लढायचं’ असा निर्धार व्यक्त करत शिवतारे यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला.

अजित पवारांनी नीच पातळी गाठली , शिवतारेंचेआरोप

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल चढवला. 2019 च्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्या मुलाविरोधात प्रचार केला पण तो राजकारणाचा भाग होता, निवडणुकीत कर्तव्य म्हणून केलं होतं. त्यात काहीच वैयक्तिक नव्हतं. पण अजित पवार यांनी नीच पातळी गाठली. मी २३ दिवस रुग्णालयात होतो, ट्रीटमेंट सुरू असतानाही मी अँब्युलन्समधून प्रचार केला. तेव्हा (माझी) पालखी जाणार, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. मरायला लागलात तर कशाला निवडणूक लढवताय ? तुम्ही खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे खोट बोलत आहात, असा गलिच्छ आरोप त्यांनी केला. माझ्या गाडीचा नंबर, कोणत्या कंपनीची गाडी इथंपर्यंत अजित पवार खालच्या थरापर्यंत आले. तु कसा पुढे निवडून येतोस तेच मी बघतो… महाराष्ट्रात मी कोणाला पाडायचं ठरवलं तर मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतोच असेही अजित पवार म्हणाल्याचा आरोप शिवतारेंनी केला.

अजित पवार उर्मट

मी त्यांना त्यांच्या उर्मट भाषेसाठी मी त्यांना माफ केलं. ते महायुतीत आल्यानंतर भेटून मी त्यांचा सत्कारही केला. पण पुढचे सहा ते सात महिने त्यांची गुर्मी तशीच राहिली, असं विजय शिवतारे म्हणाले. महायुतीत आल्यावरही त्यांची गुर्मी तशीच होती. त्यांचा उर्मटपणा कायम होता. “लोक म्हणायला लागले, सुनेत्रा आणि सुप्रिया आहेत. पण अजित पवार उर्मट आहेत, म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू, असं लोकं म्हणायला लागलेत, असंही शिवतारे म्हणाले.