झेडपी उपाध्यक्षाच्या पतीची भरसभेत घुसून प्रशासनाला शिवीगाळ

झेडपी उपाध्यक्षाच्या पतीची भरसभेत घुसून प्रशासनाला शिवीगाळ

वर्धा : स्थानिक पातळीवर अनेक महिला केवळ नावालाच लोकप्रतिनिधी असल्याचं आपण पाहतो. पतीच सर्व कामकाज पाहतात. वर्ध्यातही असाच प्रकार समोर आलाय. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मोठ्या गोंधळात झाली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि त्यांचे पती यांनी प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सभेत गोंधळ घातला. प्रल्हाद उर्फ बाळा नांदूरकर यांनी भरसभेत शिवीगाळ केली. त्यांनी झेडपी अध्यक्षांच्या भूमिकेवरही संशय घेतला.

जिल्हा परिषदेमध्ये ग्राम पंचायत स्तरावरील फ्लेक्स आणि बॅनर प्रकरणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर यांनी केला. तसे पत्रच उपाध्यक्षांचे पती आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा नांदूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलंय. विशेष म्हणजे विरोधकांनी हा मुद्दा उचलला आणि त्यात शंभर टक्के सत्यांश असल्याचे पत्रात नमूद केले.

जिल्हा परिषद अध्यक्षांवरही संशय, भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांवर या घोटाळ्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळेच सभेत मुद्दा गाजणार असल्याचा वेध घेत प्रशासन आणि अध्यक्षांनी केवळ अर्ध्या तासात सभा गुंडाळली असल्याचा आरोप सभेच्या शेवटच्या टप्प्यात सभागृहात पोहचलेल्या उपाध्यक्ष कांचन नांदूरकर आणि प्रल्हाद उर्फ बाळा नांदूरकर यांनी केला.

त्यामुळेच सभा संपल्यावर जिल्हा परिषदेच्या सभागृहात बुधवारी दुपारी 12.30 वाजता गोंधळ पाहायला मिळाला. गोंधळात पार पडलेल्या या सभेत अनेक मुद्दे अनुत्तरित राहिले. तर भाजपमधील अंतर्गत कलह यानिमित्ताने समोर आला.

ग्रामपंचायतींच्या कामात भ्रष्टाचार?

वर्धा जिल्हा परिषदमध्ये भाजपची सत्ता आहे. ग्रामपंचायत सक्षम करण्याच्या दृष्टीने 14 व्या वित्त आयोगाचा निधी शंभर टक्के खर्च करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे. यावर शक्कल लढवली जात आहे. फर्स्ट एड किट 5 हजार रुपयात ग्रामपंचयातमध्ये पोहोचली. 150 व्या गांधी जयंतीच्या निमित्ताने 20 बाय 10 आकाराचे फलक ग्रामपंचायतीची मागणी नसताना पुरविण्यात आले. मार्केटमध्ये कमी किमतीचे असणारे हे फलक 7 हजार रुपये किमतीचे असल्याचे सांगत 14 व्या वित्त आयोगातून बिल काढण्यात आल्याचा आरोप बाळा नांदूरकर यांनी केला.

शाळांना आणि अंगणवाड्यांना वजनकाटे पुरविणे, शाळेत पाण्याची व्यवस्था नसताना वॉटर फिल्टर पोहोचवणे अशा अनेक प्रकारात भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप बाळा नांदूरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात करीत चौकशीची मागणी केली आहे.

हे सर्व प्रकरण बुधवारी सभेत मांडले जाणार याचा अंदाज अध्यक्ष आणि प्रशासनाला होता. त्यामुळेच अर्ध्या तासात सभा गुंडाळण्यात आली. सभेला उपस्थित असणाऱ्या विरोधकांनाही सभा गुंडाळत असल्याने आश्चर्य वाटले. सभा संपून अखेरच्या प्रार्थनेच्या वेळेत सभागृहात पोहोचलेल्या उपाध्यक्ष आणि त्यांचे पती प्रल्हाद उर्फ बाळा नांदूरकर यांनी आपला रोष व्यक्त करत अध्यक्षांसह मुख्य कार्यपालन अधिकारी यांना शिवीगाळ केली. त्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अखेर उपाध्यक्षांच्या पतीने वाद केल्याचा ठपका ठेवत सभागृहाने त्यांना माफी मागावी असा ठराव घेण्यात आला आहे. ज्यावेळी सभेत प्रल्हाद उर्फ बाळा नांदूरकर यांनी हस्तक्षेप केला, त्यावेळी वाद वाढू नये यासाठी रिपाई आठवले गटाचे विजय आगलावे यांनी त्यांना बाहेर काढले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI