जादूटोण्याच्या संशयातून वॉचमनची हत्या

जादूटोण्याच्या संशयातून वॉचमनची हत्या

वर्धा : देवळी तालुक्याच्या इंझाळा येथील शेतकऱ्याच्या गोट फार्मवर काही दिवसांपूर्वी वॉचमनवर रात्रीच्या वेळेस हल्ला झाला. शेळ्या चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी हा हल्ला केला असावा, असा कयास पोलिसांनी त्यावेळी लावला होता. या हल्ल्यात त्या वॉचमनचा मृत्यू झाला होता. पण या हल्ल्यामागे जादूटोण्याचे षड्यंत्र दडले असल्याचे आता उघडकीस आले आहेत. पोलिसांनी कसून तपास केल्यावर वॉचमनवरील हल्ला हा जादूटोण्याच्या कारणावरुन सुपारी देऊन केला असल्याची बाब पुढे आली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इंझाळा येथील मंगेश सुरेश भानखेडे  यांच्या शेतीमध्ये गोट फार्म आहे. या गोट फार्मवर श्रावण पंधराम हा वॉचमन म्हणून कामावर होता. 30 जानेवारीच्या रात्री अचानक अज्ञात व्यक्तींनी शेतात शिरुन वॉचमनवर हल्ला केला. पावड्याने डोक्यावर सपासप वार करून त्याला जखमी केले. याच वेळी हल्लेखोरांपैकी एक अल्पवयीन मुलगा विहिरीत पडला होता. शेतकरी मंगेश भानखेडे याने तेथे पोहचल्यावर त्या मुलाला बाहेर काढले. बाहेर काढताच त्या मुलानेही तेथून पळ काढला.

त्यानंतर, पोलिसांनी आपला तपास सुरु केला. पळून गेलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत पोलिसांनी आपली सूत्रे हलवली. नेमका हल्ला हा शेळी चोरण्यासाठी झाला नसून तो जादूटोण्याचे जुन्या वादातून झाला असल्याचे समोर आले आहे. हल्ला करणारे पुलगाव नजीकच्या नाचणगाव येथील आरोपी असल्याचे समोर आले आहे.

नाचणगाव येथील रमेश पाखरे याचा मुलगा एका वर्षाआधी मृत पावला होता. रमेश पाखरे याचा आपल्या मुलाच्या मृत्यूच्या मागे श्रावण पंधराम जबाबदार असल्याचा समज होता. श्रावण पंधराम याने आपल्या मुलावर जादूटोणा केला असल्याचा संशय रमेशला होता. रमेशच्या लहान मुलाची तब्येत खराब होण्यामागे वॉचमन श्रावणचा हात असल्याच्या संशयावरुन त्याच्यावर हल्ला करण्यासाठी नाचणगाव येथील तिघांना सुपारी दिली होती. ठरल्याप्रमाणे 30 जानेवारीला हल्ला झाला आणि या हल्ल्यात वॉचमनचा मृत्यू झाला. तपासात पोलिसांना श्रावण पंधराम याच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनीं रमेश पाखरे, ईश्वर पिंजरकर, अंकुश विलास शेंडे आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

Published On - 3:54 pm, Wed, 6 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI