मुस्लिम कुटुंबातील लग्नसोहळ्याची पत्रिका संस्कृत भाषेत

| Updated on: Dec 20, 2019 | 5:11 PM

सोलापुरातील एका मुस्लीम कुटुंबाने स्वत:च्या घरातील लग्नसोहळयाची निमंत्रणपत्रिका चक्क संस्कृतमधून छापण्याची परंपरा तिसऱ्या पिढीपासून कायम राखली आहे.

मुस्लिम कुटुंबातील लग्नसोहळ्याची पत्रिका संस्कृत भाषेत
Follow us on

सोलापूर : सध्या देशभरात एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून कुठे आंदोलनं, तर कुठे हिंसेच्या घटना घडत आहेत (CAA Protest). मात्र हे सर्व होत असताना सोलापुरातील एका मुस्लिम कुटुंबाने स्वत:च्या घरातील लग्नसोहळयाची निमंत्रणपत्रिका चक्क संस्कृतमधून छापण्याची परंपरा तिसऱ्या पिढीपासून कायम राखली आहे (Muslim Wedding invitation in Sanskrit).

सोलापुरातील कुमठा नाका परिसरातील बिराजदार या मुस्लिम कुटुंबातील आझम नवाज यांचं लग्न ठरलं. मात्र, या लग्नाची निमंत्रण पत्रिका जरा हटके आहे (Muslim Wedding invitation in Sanskrit). संस्कृत भाषा आणि साहित्याचा प्रसार करणाऱ्या सोलापुरातील मुस्लिम कुटुंबाने संस्कृत भाषेच्या प्रेमापोटी संस्कृत भाषेत लग्नाची निमंत्रण पत्रिका छापली आहे.

ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या नातवाच्या लग्नासाठी संस्कृत भाषेतून निमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहे. संस्कृत भाषा आणि साहित्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी गेल्या सहा दशकांपासून देशभरात भटकंती करणारे पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार हे मूळचे सोलापूर जिल्ह्य़ाच्या अक्कलकोट तालुक्यातील राहणारे आहेत. संस्कृत भाषेसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे बिराजदार यांनी संस्कृतमध्ये विपुल लेखनासह ओघवती व्याख्याने देत संस्कृत प्रचाराचा जणू वसा जपला आहे.

संस्कृत भाषेतून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. अलीकडेच त्यांनी इस्लाम धर्माच्या पवित्र कुराण ग्रंथाचा संस्कृत भाषेतून अनुवाद करण्याचा प्रकल्पही जवळपास पूर्ण केला आहे. कुराण, हदीस आणि अन्य इस्लामी ग्रंथांबरोबरच महाभारत, रामायणासह वेद-पुराण, उपनिषदांचाही त्यांचा सखोल अभ्यास आहे. संस्कृत भाषेच्या प्रेमापोटी पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी पन्नास वर्षांपूर्वी आपल्या बंधूंच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका चक्क संस्कृतमधून छापली होती.

ही परंपरा पुढे चालवत आपले पूत्र तथा मराठी कवी बदिउज्जमा बिराजदार यांच्यासह दोन्ही मुलींच्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकाही संस्कृतमधून छापल्या होत्या. हा वारसा तिसऱ्या पिढीसाठी जतन करीत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी आपली नात डॉ. मिनाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका संस्कृतमधून छापली होती. त्यानंतर दोन वर्षांनी आता बदिउज्जमा यांचे पूत्र तथा पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचे नातू आझम नवाज यांच्या लग्नाची पत्रिकाही संस्कृतमधून छापण्याची परंपरा कायम राखण्यात आली आहे.

हा लग्नसोहळा येत्या 22 डिसेंबरला सोलापुरात होणार आहे. संस्कृत भाषेसह मराठी, उर्दू आणि इंग्रजी अशा चार भाषांतून छापण्यात आलेली ही लग्नपत्रिका कुतूहलाचा विषय ठरत आहे.

संस्कृत ही भारतीय संस्कृतीसह सर्व भाषांची जननी आहे. आयुष्यभर या भाषेवर नितांत प्रेम करीत असताना कुटुंबातील लग्नाची निमंत्रणपत्रिका संस्कृत भाषेतून छापणे हे देखील तेवढेच आनंददायक वाटते. संस्कृत भाषा ही संपूर्ण भारतीय संस्कृती आणि एकात्मतेला जोडणारी आहे. याच भावनेतून घरातील विवाहसोहळ्यांची लग्नपत्रिका संस्कृतमधून छापण्याची परंपरा चालविली आहे, असं मत आझम नवाज यांनी व्यक्त केलं.