अमेरिकेतील गोळीबाराचा तो खळबळ उडवणारा व्हिडीओ समोर, जीव वाचवण्यासाठी लोक टेबलखाली लपले, ट्रम्पही..
वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटमध्ये झालेल्या गोळीबारात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. मात्र, याच हॉटेलमध्ये तब्बल 2600 लोक उपस्थित होते त्यांनी मात्र, आपला जीव टेबलाखाली लपून वाचवला आहे.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे आयोजित प्रतिष्ठित व्हाइट हाऊस कॉरेस्पोंडेंट्स डिनर दरम्यान अचानक गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना हिल्टन हॉटेलमध्ये शनिवारी रात्री घडली. या वेळी अमेरिकनचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कार्यक्रमात उपस्थित होते. घटनेनंतर त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
गोळीबाराचा आवाज ऐकताच हॉलमध्ये उपस्थित हजारो लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुमारे 2600 हून अधिक पाहुणे या कार्यक्रमात उपस्थित होते. अनेकजण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी टेबलखाली लपले तर हॉटेलमधील कर्मचारी आपला जीव वाचवण्यासाठी थेट हॉटेलमधून बाहेर पळताना दिसले.
ट्रम्प यांना तातडीने हलवले
गोळीबार होताच सुरक्षारक्षकांनी तत्काळ डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवले आणि सुरक्षित ठिकाणी नेले. त्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस देखील उपस्थित होते. सुदैवाने या गोळीबाराच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे गोंधळाचे चित्र दिसते आहे. एका रिपोर्टरने सांगितले की, सुरुवातीला मोठा आवाज ऐकू आला, तो भांड्यांचा आवाज असेल असे वाटले. पण काही सेकंदातच वेटर्स घाबरून पळताना दिसले. तेव्हा परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले. लोक टेबलखाली लपले होते आणि काही वेळातच सुरक्षारक्षक बंदुका घेऊन तैनात झाले.
हल्लेखोर अटकेत
या प्रकरणात सुरक्षारक्षकांनी संशयित हल्लेखोराला अटक केली आहे. मात्र, त्याने गोळीबार का केला, त्याचा नेमका उद्देश काय होता आणि तो कोणाला लक्ष्य करत होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही हल्लेखोर शस्त्रासह कार्यक्रमस्थळी कसा पोहोचला, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील उच्चस्तरीय कार्यक्रमांच्या सुरक्षेवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.