Saikheda Dam | यवतमाळमधील सायखेडा धरण पूर्णपणे भरलं, 140 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

पावसाचे आगमन उशिराने का होईना परंतु अतिशय जोरात झाल्याने, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील एकमात्र मध्यम प्रकल्पाचे सायखेडा धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहत आहे.

Saikheda Dam | यवतमाळमधील सायखेडा धरण पूर्णपणे भरलं, 140 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
| Updated on: Aug 09, 2019 | 10:58 AM

यवतमाळ : पावसाचे आगमन उशिराने का होईना परंतु अतिशय जोरात झाल्याने, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील एकमात्र मध्यम प्रकल्पाचे सायखेडा धरण (Yavatmal saikheda dam) पूर्णपणे भरून ओसंडून वाहत आहे.

केळापूर तालुक्यातील नागरिकांसाठी सायखेडा येथील मध्यम प्रकल्पाचे धरण पिण्याच्या पाण्याचे एकमेव जलस्रोत आहे. शिवाय शेतीसाठीही या धरणाचा मोठा फायदा होतो. तालुक्यातील 140 गावांना याच धरणातील पाण्याचा मुख्य आधार आहे.

पावसाच्या पाण्यामुळे सायखेडा धरण दरवर्षीच भरून ओसंडून वाहत असते. मात्र, येथील धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असून पाटबंधारे विभागातर्फे दरवर्षी धरणात साचलेल्या गाळाचा उपसा करण्यासाठी कोणतीही खास उपाययोजना करण्यात येत नाही.

यावर्षी मान्सूनच आगमन खूपच उशिराने झाले, पावसाने पाठ फिरविल्याने सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, उशिराने का होईना सर्वंच ठिकाणी दमदार पाऊस पडल्याने तालुक्यातील एकमात्र मध्यम प्रकल्पाचे सायखेडा धरण शंभर टक्के भरले.

धरणाच्या भिंतीवरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. सायखेडा धरण शंभर टक्के भरल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील आता मिटलेला आहे.