कुलर सुरु करताना शॉक, एकमेकींना वाचवताना तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू

सहा वर्षांची रिया भुसेवार, चार वर्षांची मोनिका भुसेवार आणि दोन वर्षांची मोंटी भुसेवार दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडल्या.

कुलर सुरु करताना शॉक, एकमेकींना वाचवताना तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू
| Updated on: Jul 30, 2020 | 5:13 PM

यवतमाळ : कुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकमेकींना वाचवताना सहा वर्षांखालील तीन सख्ख्या बहिणींचा करुण अंत झाला. (Yavatmal Sisters dies of electric shock while starting cooler)

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात श्रीरामपूरमध्ये (कोदुरली) ही घटना घडली. सहा वर्षांची रिया भुसेवार, चार वर्षांची मोनिका भुसेवार आणि दोन वर्षांची मोंटी भुसेवार दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडल्या. भुसेवार कुटुंबाच्या राहत्या घरी आज (गुरुवारी) सकाळी ही घटना घडली.

घरात तिन्ही मुली जेवत बसल्या होत्या. त्यावेळी मोठी बहीण कुलर सुरु करण्यास गेली. मात्र विजेचा जोरदार धक्का बसल्याने ती तिथेच चिकटली. ताईला काढण्यासाठी दुसरी बहीण गेली असता तिलाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर तिसरी मुलगीही आपल्या बहिणींना काढायला गेली, तेव्हा तिलाही जोरदार करंट लागला. यामध्ये तिन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : आई बॉल आणायला खाली उतरली, बाल्कनीतून तोल जाऊन दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

घटना घडली त्यावेळी मुलींचे वडील शेतावर गेले होते, तर आईसुद्धा बाहेर गेली होती. घरी परतल्यावर आपल्या तीन मुलींना निपचित पडलेले पाहून त्यांनी एकच टाहो फोडला.

पोलीस घटनास्थळी जाऊन अधिक तपास करत आहेत. या घटनेने भुसेवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.