
गणेश चतुर्थीचा सण जवळ आला आहे आणि बाप्पांना त्यांच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. नेहमीचे मोदक (Modak) तर तुम्ही बनवता, पण यावर्षी काहीतरी वेगळं आणि हटके ट्राय करा. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अगदी सोपी आणि झटपट होणारी पोहा मोदक रेसिपी (Poha Modak Recipe). हे मोदक चवीला खूपच छान लागतात आणि लहान मुलांनाही ते नक्कीच आवडतील. चला, तर मग जाणून घेऊया ही रेसिपी कशी बनवायची.
1. ड्राय फ्रूट्स भाजून घ्या: सर्वात आधी एका पॅनमध्ये थोडं तूप गरम करा. त्यात बारीक केलेले काजू आणि बदाम टाकून 2 ते 3 मिनिटे किंवा त्यांचा सुगंध येईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर ते एका वाटीत काढून ठेवा.
2. पोहे भाजून घ्या: आता त्याच पॅनमध्ये पोहे घालून ते व्यवस्थित भाजून घ्या. पोह्यांचा रंग पांढऱ्यातून हलका सोनेरी होईपर्यंत त्यांना सतत परतत राहा. पोहे भाजून झाल्यावर त्यांना थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सरमधून त्यांची बारीक पावडर करून घ्या.
3. मिश्रण तयार करा: एका दुसऱ्या पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवा. दुधाला उकळी आल्यावर गॅस मध्यम आचेवर करा. दूध अर्धे होईपर्यंत ते उकळू द्या. दूध उतू नये म्हणून दर 2 मिनिटांनी ढवळत राहा. दूध अर्धे झाल्यावर त्यात साखर घालून ती पूर्ण विरघळेपर्यंत ढवळून घ्या.
4. मोदक बनवा: आता या दुधाच्या मिश्रणात भाजलेले ड्राय फ्रूट्स आणि पोह्याची पावडर घाला. मिश्रण चांगले एकत्र करून घट्ट होईपर्यंत शिजवा, जेणेकरून ते पॅनच्या कडा सोडू लागेल. आता हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या. मोदक साच्याला थोडे तूप लावून घ्या. तयार झालेले मिश्रण साच्यात भरून मोदकाचा आकार द्या.
अशा प्रकारे तुमचे स्वादिष्ट पोहा मोदक (Poha Modak) तयार आहेत. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. यंदाच्या गणेश चतुर्थीला बाप्पांना पोहा मोदकांचा नैवेद्य दाखवून सणाचा आनंद द्विगुणीत करा.