
कधी कधी आपण इतके थकलेले असतो तरीही आपल्याला रात्रीची झोप येत नाही. झोपेसाठी कितीही प्रयत्न केला तरी देखील शांत झोप मात्र येत नाही. आणि हे चक्र सतत सुरुच राहतं. त्यासाठी तुम्ही तुमच्या बेडरुममध्येही छोटे मोठे बदल करू शकता. उदाहरणार्थ, खोलीतील दिवे मंद करणे, शांत वातावरण तयार करणे आणि झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा मोबाईल पाहणे टाळणे. किंवा काहीजण बेडरुममध्ये मंद प्रकाश आणि सुंगधी वातावरणासाठी सेंटेड कॅन्डलही लावतात. ज्यामुळे वातावरणात एक शांतता पसरते आणि झोपही शांत येण्यास मदत होते.
पण अजून एक पद्धत तुम्ही वापरू शकता ती म्हणजे शांत आणि चांगली झोप येण्यासाठी बेडरूममध्ये काही खास वनस्पती, रोप लावू शकता. झोप येण्यासाठी काही रोपे बेडरुममध्ये लावल्यास झोप येण्यास मदत होते. शिवाय डोकही शांत राहते. त्या वनस्पती कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात.
अशी कोणती रोपो आहेत जी बेडमध्ये ठेवल्याने शांत झोप येण्यास मदत होते?
जास्मिन
चमेलीचा म्हणजे जास्मिनचा गोडसर आणि सौम्य सुगंध ताण कमी करण्यास मदत करतो. त्याचा सुगंध रात्री मनाला शांतता प्रदान करतो, ज्यामुळे लवकर झोप येण्यास मदत होते. तुम्ही ते तुमच्या खोलीत खिडकीजवळ ठेवू शकता.
लॅव्हेंडर
लॅव्हेंडरचा सुगंध शरीराला आराम देतो आणि मनाला शांत करतो. म्हणूनच, ते बेडरूममध्ये ठेवणे खूप फायदेशीर मानले जाते. ही वनस्पती आकाराने देखील लहान असते म्हणून तुम्ही ते बेडसाईड टेबलवर देखील ठेवू शकता.
कॅमोमाइल
कॅमोमाइल हे रोप देखील बेडरुममध्ये ठेवणे अत्यंत लाभदायी मानलं जातं. कॅमोमाइलचा चहा देखील बनवला जातो. बेडरूममध्ये ही वनस्पती ठेवल्याने नैसर्गिकरित्या झोप सुधारू शकते.
रोझमेरी
याशिवाय, बेडरुममध्ये रोझमेरी वनस्पती ठेवू शकता. त्याचा सुगंध मनाला आराम देण्यास मदत करतो. शिवाय, या वनस्पतीला जास्त देखभालीचीही आवश्यकता नसते.
अशा काही वनस्पती किंवा रोप आहेत ज्यामुळे बेडरुमचे वातावरण तर शांत होते, सकारात्मक होते शिवाय झोप लागण्यासही मदत होते. त्यामुळे ही रोपे बेडरुममध्ये लावून शांत झोपेचा अनुभव तुम्ही नक्कीच घेऊ शकता.