
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्यासाठी ताज्या पालेभाज्या आणि फळांना प्राधान्य देतो. मात्र या भाज्या शेतातून आपल्या ताटापर्यंत येताना त्यावर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा (Pesticides) आणि रसायनांचा मारा केलेला असतो. त्यामुळे जर तुम्हीही केवळ साध्या पाण्याने भाज्या धुवत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात.
भाज्या केवळ पाण्याने धुतल्याने ही रसायने निघून जात नाहीत. ज्यामुळे कालांतराने कर्करोग, पोटाचे विकार आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या गंभीर आजारांना होऊ शकतात. त्यामुळे जर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी भाज्या स्वच्छ धुण्याच्या काही सोप्या घरगुती टीप्स आज आपण जाणून घेणार आहोत.
१. मिठाचे पाणी : कीटकनाशके घालवण्यासाठी मीठ हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे. एका मोठ्या टबमध्ये पाणी घेऊन त्यात २ चमचे समुद्री मीठ (मीठाचे मोठे खडे) टाका. या पाण्यात भाज्या २० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर साध्या नळाच्या पाण्याखाली त्या पुन्हा एकदा स्वच्छ धुवा.
२. बेकिंग सोडा : अनेक संशोधनानुसार, बेकिंग सोड्याचे पाणी कीटकनाशके काढून टाकण्यासाठी सर्वात प्रभावी मानले जाते. यासाठी १ लीटर पाण्यात साधारण १ चमचा बेकिंग सोडा मिसळा. साधारण १२ ते १५ मिनिटे भाज्या त्या पाण्यात ठेवा. हे द्राव्य भाज्यांवरील चिकट रसायने काढून टाकण्यास मदत करते.
३. व्हिनेगर : व्हिनेगरमधील आम्लयुक्त (Acidic) गुणधर्म केवळ रसायनेच नाही तर भाज्यांवरील जीवाणू देखील नष्ट करतात. यासाठी पाण्याचे आणि पांढऱ्या व्हिनेगरचे ३:१ असे प्रमाण ठेवा. जर ३ कप पाणी असेल तर १ कप व्हिनेगर घ्या. द्राक्षे, बेरीज आणि सफरचंद यांसारख्या फळांसाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे.
४. गरम पाणी, हळद आणि मीठ : फ्लॉवर, ब्रोकोली किंवा कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये बारीक किडे लपलेले असतात, जे डोळ्यांना सहज दिसत नाहीत. कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि मीठ टाका. हळद ही नैसर्गिक जंतुनाशक (Antiseptic) म्हणून काम करते, ज्यामुळे भाजी पूर्णपणे निर्जंतुक होते.
५. साल काढणे : काकडी, बटाटा, गाजर किंवा सफरचंद यांसारख्या भाज्या आणि फळांच्या सालीमध्ये रसायनांचे प्रमाण सर्वाधिक असते. शक्य असल्यास त्यांची साल काढूनच वापर करा. यामुळे कीटकनाशकांचा धोका ९० टक्क्यांपर्यंत कमी होतो. भाज्या बाजारातून आणल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये न ठेवता, आधी त्या वरीलपैकी एका पद्धतीने स्वच्छ करा, पूर्ण कोरड्या करा आणि मगच साठवून ठेवा. यामुळे त्या जास्त काळ टिकतात.