
एखादी गृहिणी असो किंवा नवीन स्वयंपाक शिकणारा एखाद्या व्यक्ती… अनेकदा घाईघाईत किंवा अंदाज चुकल्यामुळे प्रत्येकाच्या हातून भाजीत मीठ जास्त पडते. मीठ जास्त झाले की संपूर्ण जेवणाची चव बिघडते. यामुळे संपूर्ण मेहनतीवर पाणी पडते. मात्र, अशा वेळी भाजी फेकून न देता किंवा टेन्शनमध्ये न येता स्वयंपाकघरातील काही गोष्टी वापरून तुम्ही मिठाचा खारटपणा सहज कमी करु शकता.
1. कणकेच्या गोळ्यांचा वापर: जर रस्सा भाजी किंवा आमटीमध्ये मीठ जास्त झाले असेल, तर गव्हाच्या पिठाचे (कणकेचे) छोटे छोटे ३-४ गोळे करुन भाजीत टाका. साधारण १० ते १५ मिनिटे हे गोळे भाजीत राहू द्यावेत. पीठ अतिरिक्त मीठ शोषून घेते. जेवण वाढण्यापूर्वी हे गोळे काढून टाका.
2. उकडलेला बटाटा: बटाटा हा मिठाचा उत्तम शोषक मानला जातो. भाजीत मीठ जास्त झाल्यास कच्च्या बटाट्याच्या फोडी किंवा उकडलेला बटाटा मॅश करून टाकावा. १० मिनिटांनंतर हे बटाटे जास्तीचे मीठ काढून टाकण्यास मदत करतात.
3. लिंबाचा रस आणि साखर: जर मीठ थोडेसे जास्त झाले असेल, तर त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमूटभर साखर घालावी. लिंबाचा आंबटपणा आणि साखरेचा गोडवा मिठाच्या तिखट चवीला न्यूट्रलाईज (Neutralize) करतो.
4. भाजलेले बेसन: सुकी भाजी किंवा कडधान्यांच्या भाजीत मीठ जास्त झाले असल्यास, थोडे बेसन कोरडे भाजून त्यात मिसळावे. यामुळे भाजीला छान बाइंडिंग येते. तसेच खारटपणाही कमी होतो.
5. साय किंवा दुधाचा वापर: पनीरची भाजी किंवा कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात थोडे दूध किंवा दुधावरची साय फेटून टाकावी. यामुळे ग्रेव्हीची चव सुधारते. त्यासोबतच मिठाचे प्रमाणही योग्य होते.
6. ब्रेडचा वापर : जर रस्सा भाजीमध्ये मीठ खूपच जास्त झाले असेल, तर पांढऱ्या ब्रेडचे १-२ तुकडे भाजीत टाका. ब्रेड खारट पाणी वेगाने शोषून घेतो. साधारण २-३ मिनिटांनंतर ब्रेड मऊ होऊन तुटण्यापूर्वी तो काळजीपूर्वक बाहेर काढावा. रस्सा भाजीसाठी हा एक अत्यंत जलद उपाय आहे.
7. भाजलेला कांदा : जर मसाला ग्रेव्ही किंवा चिकन-मटण रस्स्यात मीठ जास्त झाले असेल, तर कांदा कापून तो तेलात चांगला लाल होईपर्यंत तळा. त्याची पेस्ट करून भाजीत मिसळा. कांद्याचा गोडसरपणा मिठाची तीव्रता कमी करतो. तसेच भाजीची ग्रेव्ही देखील दाट होते.