सर्वाधिक खोटं कोण बोलतं? महिला की पुरुष? नव्या संशोधनात धक्कादायक सत्य
सर्वाधिक खोटं कोण बोलतं, महिला की पुरुष? या प्रश्नावर पोर्टसमाउथ विद्यापीठाच्या अभ्यासात धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पुरुष स्वतःला महिलांपेक्षा दुप्पट चांगला खोटं बोलणारा आणि खोटं लपवणारा मानतात. चुका लपवणे, प्रतिष्ठा राखणे, जबाबदाऱ्या टाळणे आणि संघर्ष टाळणे यासह अनेक कारणांमुळे स्त्री-पुरुष खोटं बोलतात. नाती टिकवण्यासाठी व भावनिक सुरक्षेसाठी महिला खोटं बोलतात.

खोटं बोलणं ही लोकांची सवय असते. काही लोक संकटात असताना खोटं बोलतात. काही लोक आपल्या चूका लपवण्यासाठी खोटं बोलतात. तर काही लोक दुसऱ्यांना हिणवण्यासाठी किंवा दुसऱ्यांना खोटं पाडण्यासाठी खोटं बोलतात. तर काही लोक एखाद्या परिस्थितीन बाहेर पडण्यासाठी खोटं बोलतात. काही लोक तर एखादी छोटी गोष्ट मोठी करून सांगण्यासाठीही खोटं बोलतात. अनेकांच्या खोटं बोलण्याच्या अनेक सवयी असतात. त्याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वावरच नाही तर, समोरच्या व्यक्तीवर, समाजावर आणि नातेसंबंधांवरही होत असतो. खोटं बोलण्यामुळे व्यक्तीवरील विश्वास कमी होतो. नात्यात दुरावा निर्माण होत असतो.
मात्र, एक प्रश्न नेहमी विचारला जातो. तो म्हणेज सर्वाधिक खोटं कोण बोलतं? स्त्रिया की पुरुष? एका अभ्यासातून याबाबतची एक रंजक माहिती समोर आली आहे. महिला छोट्या गोष्टी लपवण्यासाठी खोटं बोलतात असं काही लोकांना वाटतं. तर, काही लोकांच्या मते, पुरुष आपल्या चुका लपवण्यासाठी किंवा इतर गोष्टी गोष्टी लपवण्यासाठी खोटं बोलतात. पोर्टसमाऊथ विद्यापीठाचे संशोधक डॉ. ब्रियाना वेरिगिन यांच्या नेतृत्त्वात एक अभ्यास करण्यात आला होता. त्यातून काही रंजक माहिती समोर आली आहे. महिलांच्या तुलनेत आपण दुप्पट चांगलं खोटं बोलू शकतो, असं पुरुषांना वाटतं. तसेच आपण आपल्य खोटं सहज लपवू शकतो, असा दावाही पुरुष करत असल्याचं या अभ्यासातून पुढे आलं आहे.
पुरुष खोटं का बोलतात?
चुका लपवण्यासाठी : घर असो की ऑफिस, काही पुरुष आपल्या चुका स्वीकारण्यास मागे पुढे पाहतात. आपल्यावर दोष येऊ नये म्हणून ते सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असतात.
प्रतिष्ठेसाठी : समाजात आपली इज्जत आणि मान-सन्मान राहण्यासाठी काही लोक खोटं बोलतात. आर्थिक स्थिती, करिअरमधील यश वा खासगी गोष्टी वाढवून सांगण्यासाठी म्हणजेच फुशारकी मारण्यासाठीही काही लोक खोटं बोलतात.
जबाबदाऱ्या टाळण्यासाठी : कौटुंबीक जबाबदाऱ्या, आर्थिक निर्णय वा नात्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काही लोक बहाणे बनवत असतात. त्यासाठी खोटं बोलतात.
संघर्ष टाळणं : प्रत्येक गोष्टीवर खुलासा करणं आणि वाद करणं आवडत नसल्याने काही लोक छोट्या छोट्या गोष्टी लपवतात. त्यामुळे पुढे त्याच गोष्टीमुळे व्यक्तीवरचा विश्वास उडतो.
महिला खोटं का बोलतात?
दुखावू नये म्हणून : दुसऱ्याचं मन दुखावू नये, यासाठी काही महिला आपलं खरं मत सांगत नाहीत. उदा० एखादं गिफ्ट आवडलं नाही तरी त्याला ते चांगलं म्हणतात.
नातं टिकवण्यासाठी : कुटुंब, मैत्री वा वैवाहिक नात्यात गैरसमज होऊ नये, यामुळे महिला काही गोष्टी लपवतात. त्यामुळे नात्यात तणाव येत नाही.
भावनिक सुरक्षेसाठी : आपले विचार किंवा वैयक्तिक निर्णय सांगितल्यावर समोरचा व्यक्ती काय प्रतिक्रिया देईल? कुठे चुकीचं ठरवणार तर नाही ना? या चिंतेपायी महिला काही गोष्टी लपवतात.
भावना व्यक्त करता न येणं : मनातील दु:ख, राग आणि अस्वस्थता असतानाही मी व्यवस्थित आहे असं महिला सांगतात. भावना व्यक्त करण्यास कचरणं, दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वाटणं आदी कारणं या मागे असतात.
टीकेपासून वाचण्यासाठी : वैयक्तीक जीवन, खर्च, मैत्री आदी निर्णयावर वारंवार सवाल विचारले जातात, त्यामुळे महिला खोटं बोलून वेळ मारून नेतात.