
संपूर्ण देशात हिवाळा सुरू असून सगळीकडे कडाक्याची थंडी पहायला मिळत आहे. उत्तर भारतातील पर्वतांवर बर्फाची जाड चादर पसरली आहे. तसेच मैदानी भागात थंड वारे वाहत असून अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे शरीराला गरम ठेवण्यासाठी लोक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत. यंदाची थंडी पाहून अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, भारतातील सर्वात थंड ठिकाण कोणते? अनेकांना वाटत असेल की हे ठिकाण हिमाचल प्रदेश किंवा जम्मू-काश्मीरमध्ये असेल. मात्र देशातील सर्वात थंड ठिकाण हे या भागात नाही. आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका गावाबद्दल माहिती सांगणार आहे जिथे तापमान खूप कमी असते. या गावात ओले कपडे बर्फासारखे गोठतात. हे गाव कोणते आणि कुठे आहे ते जाणून घेऊयात.
देशातील सर्वात थंड गाव हे लडाख या केद्रशासित प्रदेशात आहे. द्रास असे या गावाचे नाव असून हे गाव लडाखमधील कारगिलपासून फक्त 64 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील तापमान रेफ्रिजरेटर फ्रीजरपेक्षा खूप कमी आहे. याठिकाणी केस ओले केले तर तुमच्या केसांमध्ये बर्फ तयार होतो. या गावातील तापमान दरवर्षी -20°C ते -25°C पर्यंत घसरते. 1995 मध्ये या गावातील तापमान -60°C पर्यंत घसरले होते.
द्रास हे भारतातील सर्वात थंड गाव आहे, त्यामुळे या गावाल भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात. तुम्हालाही या गावाला भेट द्यायची असेल तर तुम्ही श्रीनगर किंवा लेहला विमानाने जाऊ शकता. त्यानंतर टॅक्सी बुक करून रस्त्याने द्रासला जाऊ शकता. तसेच तुम्ही रेल्वेने जम्मू तावीला जाऊ शकता. तेथून 386 किलोमीटर प्रवास करून या गावाला भेट देऊ शकता.
पर्यटनासाठी द्रासला जाणाऱ्या लोकांच्या मुक्कामाची सोय द्रासमध्ये करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अनेक निवास सुविधा उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही कारगिलमध्ये मुक्काम करून द्रासला वनडे ट्रीप साठी जाऊ शकता. महत्त्वाची बाब म्हणजे उन्हाळा आणि पावसाळ्यातही येथील कमाल तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. या गावात तुम्हा झोजिला पास, द्रास युद्ध स्मारक, द्रौपदी कुंड आणि मुश्को व्हॅली या ठिकाणांना भेट देऊ शकता.
ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर कनिष्क गुप्ताने द्रासचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, जा खूर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये या गावाची झलक दाखवण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये बर्फाच्छादित दऱ्या दिसत आहेत, तसेच ओले कपडे गोठलेले दिसत आहे.