Golden Mountain: काय सांगता भारतात सोन्याचा डोंगर? कुठंय तो सुवर्ण पर्वत? तरी सोनं इतकं महाग का?

Golden Mountain of India: देशातच काय, जगात सगळीकडं सोन्याच्या किंमतींनी धुमाकूळ घातला आहे. सोन्याचा भाव गगनाला भिडले आहेत. पण तुम्हाला भारतात सोन्याचा डोंगर आहे हे माहिती आहे का? विशेष म्हणजे हा डोंगर पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. तुम्ही कधी तिथं गेलात का?

Golden Mountain: काय सांगता भारतात सोन्याचा डोंगर? कुठंय तो सुवर्ण पर्वत? तरी सोनं इतकं महाग का?
सोन्याचा डोंगर
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 07, 2026 | 3:39 PM

Golden Mountain of India: देशात सोन्याच्या किंमती दिवसागणिक वाढत आहेत. सोन्याच्या भावाने महागाईचा डोंगर सर केला आहे. सोने आता केव्हा पण दोन लाखांचा टप्पा गाठेल अशी भीती ग्राहकांना वाटत आहे. आता सोन्याचा दागिने घेणे हा काही सामान्यांचा विषय उरला नाही. बाजारात एखादा दिवस सोने दणकावून आपटते तर दुसर्‍या दिवशी किंमती पुन्हा गगनाला भिडतात. पण भारतात सोन्याचा डोंगर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? विशेष म्हणजे देशातूनच नाही तर जगभरातून पर्यटक हा सोन्याचा डोंगर पाहण्यासाठी येतात. कुठंय तो सुवर्ण पर्वत?

कांचनजंगा-भारताचा सुवर्ण पर्वत

भारतातील हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये कांचनजंगा हा पर्वत आहे. हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा उंच पर्वत आहे. तर भारतातील हे सर्वात उंच शिखर आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी या बर्फाच्छादित शिखरांवर सूर्याचा सोनेरी प्रकाश पडतो. हा पर्वत जणू सोन्याने न्हाऊन निघतो. सूर्यकिरण बर्फावर अशा प्रकारे पहुडतात की संपूर्ण पर्वत जणू वितळलेल्या सोन्याने मढवलेला वाटतो.  आता कोटी लक्षात आली का, का भारतात सोने महाग आहे ते…

हा पर्वत भारत आणि नेपाळ या देशांच्या सीमेवर उभा ठाकलेला आहे. त्याची उंची सुमारे 8,586 मीटर आहे. दार्जिलिंग, सिक्कीम आणि उत्तर बंगालमधील काही भागातून हा सोनेरी पर्वत दृष्टीस पडतो आणि सकाळ-संध्याकाळ डोळ्याचं पारणं फिटते.हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भारतात येतात. हा अनुभव कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक जण भल्या पहाटे या पर्वतरांगाच्या जवळपास कडाक्याच्या थंडीतही मोठ्या उत्साहात दाखल होतात.

कांचनजंगाचा सोनेरी डोंगर कुठे पाहता येईल?

चारखोल, कालिम्पोंग, दार्जिलिंग जवळील टायगर हिल तसेच बतासिया लूप या ठिकाणाहून पहाटेवेळी पर्वताचे बदलणारे रंग पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. बतासिया लूप येथून तर हिमालय 360 डिग्रीतून पाहता येतो. सिक्कीममधील लोअर पेलिंग अनेक हॉटेल्सच्या खिडकी आणि टेरेस, गच्चीवरून हा सोनेरी डोंगर डोळेभरून हृदयात साठवता येतो. तर सिक्कीम मधील रुमटेक कांचनजंगा व्हयू पॉईंटवरही मोठी गर्दी होते. इथे तर ढग अगदी आपल्याला भेटायला आल्याचा अनुभव घेता येतो.

कांचनजंगा पाहण्यासाठी सर्वोत्तम काळ कोणता?

Kanchenjunga पर्वताला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर आणि मार्च ते एप्रिल हे महिने सर्वात चांगले मानल्या जातात. या काळात आकाश स्वच्छ आणि निरभ्र असते. सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्तावेळी या बर्फाच्छादित डोंगरावर सूर्यकिरणं पडतात आणि हा डोंगर सोनेरी होतो.