बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? आजच बनवा बटाच्याचं मसालेदार लोणचं, जाणून घ्या रेसिपी

कोणताही पारंपरिक सण असेल तर, बटाट्याची भाजी बनवलीच जाते. अनेकांना बटाट्याची भाजी प्रचंड आवडते. पण अनेकांना बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतो.... मग झटपट लिहून घ्या बटाट्याचं लोणचं कसं तयार करायचं.

बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? आजच बनवा बटाच्याचं मसालेदार लोणचं, जाणून घ्या रेसिपी
Potato Pickle
| Updated on: Jun 29, 2026 | 3:05 PM

गवार, कोबी, मटार यांमध्ये सर्सास वापरली जाणारी एक भाजी म्हणजे बटाटा… बटाट्याचा वापर जवळजवळ प्रत्येक पदार्थात केला जातो. अनेकांना बटाट्याची भाजी प्रचंड आवडते देखील. पण सतत तिच भाजी खाल्ल्यामुळे कंटाळा देखील येतो. जर तुम्हालाही तुमच्या जेवणात काहीतरी नवीन आणि चविष्ट समाविष्ट करायचं असेल, तर मसालेदार बटाट्याचं लोणचं हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मोहरीचं तेल आणि सुगंधी मसाल्यांनी तयार केलेलं हे झटपट लोणचं डाळ-भात, रोटी किंवा पराठ्यासोबत खूप स्वादिष्ट लागतं.

बटाट्याचं लोणचं बनवण्यासाठी कोणतं साहित्य लगतं, ते आधी जाणून घ्या. चार ते पाच मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, चार ते पाच चमचे मोहरीचे तेल, एक चमचा बारीक वाटलेली बडीशेप, एक चमचा बारीक वाटलेली मोहरी, अर्धा चमचा मेथीचे दाणे, एक चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, एक चमचा काश्मिरी लाल तिखट, एक चमचा आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस, चिमूटभर हिंग, तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ… हे साहित्या तुम्हाला लागणार आहे.

बाटाट्याचं लोणचं बनवण्याची सोपी पद्धत:

प्रथम उकडलेले बटाटे सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करा. बटाटे जास्त शिजणार नाहीत याची काळजी घ्या, म्हणजे ते फुटणार नाहीत. आता एका पातेल्यात मंद आचेवर मेथी, बडीशेप आणि मोहरी हलके भाजून घ्या. थंड झाल्यावर ते जाडसर वाटून घ्या.

नंतर एका कढईत मोहरीचे तेल चांगले गरम करा. तेलातून धूर येऊ लागल्यावर गॅस बंद करा आणि तेल थोडे थंड होऊ द्या. आता तेलात हिंग घाला. नंतर तयार केलेला जाडसर मसाला, हळद, लाल मिरची आणि काश्मिरी लाल मिरची पूड घालून चांगले मिसळा.

आता या मसाल्यात बटाट्याचे तुकडे, लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून हळूवारपणे मिसळा, जेणेकरून बटाटे फुटणार नाहीत. शेवटी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा चांगले मिसळा. तुमचं झटपट बटाट्याचं लोणचं तयार आहे. ते लगेच खाल्लं जाऊ शकतं, परंतु एक ते दोन तासांनंतर, मसाल्याची चव बटाट्यांमध्ये चांगली मुरते. हे लोणचं फ्रिजमध्ये ठेवून तीन ते चार दिवस आरामात वापरता येतं.

Follow Us